अजित पवार राष्ट्रवादीचेच नेते, पक्षात फूट पडलीच नाही! सुप्रिया सुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 01:45 PM2023-08-24T13:45:06+5:302023-08-24T13:46:23+5:30
Supriya Sule News: अजित पवार यांनी बंडखोरी करत राज्यातील शिंदे-भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी आज केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी करत राज्यातील शिंदे-भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते हे अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. तर काही नेते हे शरद पवारांसोबत आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी आज केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यामधील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. पक्षातील काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केलेली आहे. अजित पवार हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र शरद पवार हेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत.
अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारला पाठिंबा दिला होता. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहेत. तसेच पक्षावरील दाव्यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर फुटीनंतर पक्षाची पुनर्बांधणी करण्याचं आव्हान समोर असतानाच सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकारचं विधान केल्यानं खळबळ उडाली आहे. तर काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पुण्यामध्ये झालेल्या गुप्त भेटीमुळेही राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही खरी की खोटी असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित झाला होता.