"एकीकडे प्रेतं जळत होती अन् दुसरीकडे हे लोक पेढे वाटत होते, महाराष्ट्रात असं घडणं म्हणजे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 10:03 AM2023-07-03T10:03:54+5:302023-07-03T10:05:12+5:30
समृद्धी महामार्गावरील अपघाताला २४ तासही झाले नसताना, राज्यात शपथविधी पार पडल्याने राऊतांचा संताप
Sanjay Raut on Ajit Pawar, Maharashtra Political Crisis: अपघातातील मृतांच्या चिता जळत असताना राजभवनावर शपथविधीचा सोहळा पार पडला हे अत्यंत निर्दयीपणाचं लक्षण आहे. मृतांच्या यादीत बारामतीमधले तीन लोक होते. विदर्भातील लोकांची प्रेतं पडलेली होती. पण २४ तास या दुर्घटनेला व्हायच्या आधीच एकीकडे प्रेतं जळत असताना, राजभवनात हे लोक पेढे वाटत होते, फटाके वाजवत होते, शपथा घेत होते. महाराष्ट्राने इतकं निर्घृण राजकारण या आधी कधीही पाहिलेलं नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारच्या शपथविधी सोहळ्यावर भाष्य केलं.
"या लोकांना शपथविधीची घाई होती, पण त्यांनी थोडं थांबायला हवं होतं. शपथविधीची इतकी धावपळ का केली. काल राज्याने जे चित्र पाहिलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारं चित्र होतं. महाराष्ट्रावर संकट कोसळलं, २५-२६ जणांचा मृत्यू झाला, सामुदायिक अंत्यसंस्कार सुरू होते, त्याच वेळी या लोकांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची घाई लागली होती. हा काय प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. भाजपा महाराष्ट्राला कलंक लावत आहेत. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व आणि नाव पुसण्याचा खेळ सुरू आहे, या लोकशाहीला न परवडणारा खेळ आहे," अशी टीका केली.
अजित पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप हे पक्ष आपापल्या नेत्यांच्या बैठका घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात आता नवा मुख्यमंत्री होणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलण्यात येणार आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल. एकनाथ शिंदे यांना हटवले जाईल. अपात्रतेच्या केसमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील. यामुळे इतक्या घाईगडबडीत अजित पवारांना सोबत घेतले आहे. त्यामुळे आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.