कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही; अजित पवारांच मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 04:33 PM2023-02-05T16:33:19+5:302023-02-05T16:33:25+5:30
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राज्यातील चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे: पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Pimpri Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीवरुन (Byelection) राज्यातील चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपकडून (BJP) बिनविरोध निवडणुकांसाठी प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे विरोधकांकडून निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असं वक्तव्य केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, 'आताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला झटका बसला आहे. येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून येईल हे त्यांनाही माहिती आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही त्यांना झटका बसणार आहे. निवडणूका म्हटलं की कोणाचा तरी विजय होत असतो. कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचं काहीच कारण नाही.'
'भाजपनेही कोल्हापूर आणि पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध केली नव्हती. एक मुंबईची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढाव. शेवटी लोकशाही आहे, जनतेला हवं त्याला ते निवडून देतील, अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी केली. दरम्यान, या दोन्ही जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असून, महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित झाले नाहीत.