सुषमा नेहरकर- शिंदेपुणे : सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक जीवनात नेहमी सल्ले देणारे, मार्गदर्शन करणारे जिल्ह्यातील नेते, मंत्री आणि आमदारांच्या वाहनांनीच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे पुढे आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्ह्यात सर्वाधिक वाहने वापरणारे आमदार सुनील शेळके वाहतुकीचे नियम मोडण्यात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, पोलिसांना, वाहतूक पोलिसांना सहकार्य करा, कायद्याने घालून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवू नका, स्वत:सोबत दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका, असे अनेक सल्ले नेतेमंडळी देतात. प्रशासकीय, पोलीस यंत्रणा आपला सर्व धाक, कायद्याची भीती ही सर्वसामान्य लोकांनाच दाखवते.
बहुतेक नेत्यांच्या वाहनांवर चलने पेंडिंगवाहतूक नियम तोडण्यात सर्वाधिक आघाडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. त्यांच्या दोन वाहनांवर २७,८०० रुपयांचा दंड होता. त्यांनी नुकतीच सर्व रक्कम ऑनलाईन भरली आहे. सर्वाधिक १४,२०० रुपये दंड भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना ५,२०० रुपये, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ६०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. बहुतेक सर्व नेत्यांच्या वाहनांवर अनेक प्रकारची चलने पेंडिंग आहेत.