Congress Kumar Ketkar on Ajit Pawar Sharad NCP Rift: राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत असतानाच, रविवारी एक मोठा राजकीय भूकंप घडला. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने भाजपा-शिवसेना युतीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या रूपाने राज्याला दुसरे उपमुख्यमंत्री मिळाले. तर राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या. त्यामुळे हे सारं शरद पवारांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा सूर सुरूवातीला उमटला होता. पण आमचा अजितदादांना पाठिंबा नाही, असे शरद पवार म्हणाले. त्यानंतर आता काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी यावर वेगळेच पण सूचक मत मांडले. तसेच, या बंडाचा काँग्रेसला कसा फायदा होईल हेदेखील सांगितले.
"राष्ट्रवादीतील पंचमस्तंभीयांचे बंड फारसे अनपेक्षित म्हणता येणार नाही. त्यासाठी शिवकालीन इतिहासाचे संदर्भ असले तरी ते देण्याची गरज नाही. त्यांची नाळ नरेंद्र मोदींच्या फॅसिस्ट राजकारणाशी जुळते हे २०१४ पासूनच दिसले आहे. एका अर्थाने झाले हे बरे झाले. आता काँग्रेस खरोखरच स्वबळावर लढू शकेल वा शक्य झाल्यास उद्धव ठाकरेंबरोबर समझोता करू शकेल. असेही म्हणता येईल की शरद पवारही त्यांच्या पक्षांच्या शृंखलांमधून मुक्त झाले आहेत. पवार समर्थकांना आता तळ्यात-मळ्यात राहण्याचे सोयीचे राजकारण करता येणार नाही", असे मत कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
"इंदिरा गांधींनी १९६९ मध्ये त्यांच्या पक्षातील पंचमस्तंभीयांना असेच आव्हान देऊन नामोहरम केले होते. इडी - सीबीआयला घाबरून जे भेकड शरद पवारांना सोडून गेले आहेत यांची गत पूर्वीच्या सिंडिकेटसारखीच दयनीय आणि दुर्लक्षणीय परिस्थिती होणार हे स्पष्ट आहे. या मंडळींच्या जाण्याने मविआ संपली पण फॅसिझम विरोधी शक्ती मात्र बळकट होऊ शकतील, कपट-कारस्थानांचे मोदी-शहांचे राजकारण भले त्यांच्या भक्तांना 'मास्टरस्ट्रोक' वाटत असेल, पण या मास्टरस्ट्रोकचा त्रिफळा कसा उडतो हे आपण अनेकदा पाहिले आहे. आता काँग्रेसने पूर्ण आमविश्वासाने आणि स्वबळाने, राहुल गांधींप्रमाणे लोकांमध्ये जाऊन पक्ष समर्थ करायल हवा – आता हवा अधिक स्वच्छ झाली आहे", अशी प्रतिक्रयाही काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी दिले.