अजितदादांच्या टीममध्ये धनंजय मुंडेंना मिळाली खास जागा, सोपवण्यात आली नवी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 08:28 PM2024-07-18T20:28:04+5:302024-07-18T21:35:23+5:30
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली याबद्दलची घोषणा
Ajit Pawar Dhananjay Munde, NCP: राज्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीचे महायुती सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ४ पैकी केवळ १ जागा जिंकता आली. पण विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी ते अपयश धुवून टाकले. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे असे दोनही उमेदवार निवडून आणले. आता सर्वच पक्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर लवकरच अजित पवार बारामतीत जाणार आहेत. त्याआधी आज अजितदादांच्या टीममधील खास नेते असलेले कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पक्षातील एक महत्त्वाची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काही महत्त्वाची माहिती दिली. सध्या कॅबिनेट मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर आता नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यात येत असल्याची त्यांनी घोषणा केली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या मान्यतेने राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते पदी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची निवड केल्याचे तटकरे यांनी सांगितले. त्यासोबतच प्रदेश प्रवक्ते पदी नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांची निवड केल्याचीही घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली.
पुढे तटकरे म्हणाले, "सोमवार दिनांक २२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अहिल्यानगर दौरा निश्चित करण्यात आला असून या दौऱ्यात महिलांशी थेट संवाद साधणार असल्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केला आहे. सकाळी पारनेर, दुपारी अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा आणि संध्याकाळी कर्जत जामखेड याठिकाणी अजितदादा पवार महिलांच्या समस्या, अडचणी समजून घेणार आहेतच शिवाय लाडकी बहिण योजना, तीन सिलेंडर मोफत, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण याबाबतही माहिती देऊन त्यांचे याबाबत मत जाणून घेऊन सरकारच्या माध्यमातून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत."
"उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, सोमवारी २२ जुलै २०२४ रोजी, अहिल्यानगर जिल्ह्याचा संवाद दौरा करतील, 'माझी लाडकी बहिण' ही योजना, तिची अंमलबजावणी, योजनेबद्दल महिलांच्या भावना, प्रश्न आणि अडचणी या संवादात मांडल्या जातील. "@AjitPawarSpeakspic.twitter.com/z5KCRRfI1d
— Sunil Tatkare (@SunilTatkare) July 18, 2024
"६४ वर्षाच्या महाराष्ट्राच्या या राजकीय आणि सामाजिक प्रवासात शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या या महाराष्ट्राने वेगवेगळे अर्थसंकल्प मांडलेले पाहिले... अनुभवले. कृषीप्रधान असलेल्या महाराष्ट्रात कृषीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. परंतु ज्या कारणासाठी वैचारिक संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी दिला त्या महिलांसाठी अभिनव योजना अजितदादा पवार यांनी यावेळी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात दिली. त्या लाडक्या बहिण योजनेचे भव्य स्वागत महाराष्ट्रातील महिला भगिनींनी केला", असे समाधान सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.