Nawab Malik in Winter Session of Maharashtra : महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूरात आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ पाहायला मिळाला. हा गोंधळ एका आमदाराच्या जागेवरून होता. ते म्हणजे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. गेल्या काही काळापासून तुरूंगाची हवा खात असलेले नवाब मलिक जामिनावर तुरूंगाबाहेर असून, आज त्यांनी अधिवेशनासाठी सभागृहात हजेरी लावली. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातील आमदारांसोबत बसले. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि नवाब मलिकांबाबत काही सवाल उपस्थित केले. पण आता यावर अजितदादांच्या गटाकडून उत्तर देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटातील नेत्या रूपाली चाकणकर यांनी नुकतीच यावर भूमिका स्पष्ट केली. "राज्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधीला असेच वाटत असतं की आपल्या भागाचा विकास व्हायला हवा. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येकालादेखील ही भावना वाटते. राज्याचा विकास अजित पवार करू शकतील असा सर्वांना विश्वास आहे. म्हणून सर्व लोकप्रतिनिधी हे अजित दादांबरोबर आहेत. सगळ्या आमदार खासदारांनी लोकप्रतिनिधींनी विकासासाठी अजितदादांना समर्थन दिले आहे. त्यामुळेच पक्षातला आमदार खासदार आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी हा अजित दादांबरोबर असल्याचे पाहायला मिळतेय," अशा शब्दांत अजित दादांच्या गटाकडून रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
विरोधकांचा आरोप काय?
नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने विधानपरिषदेत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सवाल उपस्थित केला. अंबादास दानवे म्हणाले की, आज खालच्या सभागृहात (विधानपरिषदेत) एक सदस्य बसले. या सदस्याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सातत्याने आम्ही अशा सदस्याच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अशी भूमिका घेत होते. या सदस्यावर काही गुन्हे होते, हे सर्वांना माहिती आहे. आज हेच सदस्या सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. ज्याच्याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशद्रोहाचे गुन्हे आहेत, असं बोलत होते. त्यामुळे आता सरकारची काय भूमिका आहे?, असा सवाल अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला.
फडणवीस काय म्हणाले?
अंबादास दानवेंच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. मला एका गोष्टीच आश्चर्य वाटतं की, ज्यांच्या नेत्यांनी भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती तुरुंगात असताना देखील मंत्रिपदावरुन काढणार नाही, ते आता इकडे भूमिका मांडत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच आम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. आमच्या बाजूने अजितदादा मांडीला मांडी लावून बसलेत व त्यांच्या बाजूला छगन भुजबळ बसलेत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका, असे मिस्किल प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले. देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर सदर सदस्याला मंत्रिपदावरुन का काढले नाही?, त्यांचा राजीनामा का घेतला नाही?, याचं उत्तर आधी द्या, असेही उलट सवाल देवेंद्र फडणवीसांनीही विरोधकांना केले.