जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 08:56 PM2024-07-08T20:56:01+5:302024-07-08T20:56:58+5:30

राष्ट्रवादीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सुनील तटकरेंनी दिली माहिती

Ajit Pawar led NCP to hold Big meeting rally in Baramati on July 14 after a crushing defeat by Sharad Pawar Supriya Sule Sunetra Pawar | जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा

जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा

Ajit Pawar in Baramati: लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये बारामती मतदारसंघात शरद पवार विरूद्ध अजित पवार असा प्रतिष्ठेचा सामना रंगला. त्यात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. हा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागणारा होता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून खासदार करण्यात आले. त्यामुळे आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोनही उमेदवार देशाच्या संसदेत खासदार आहेत. तसेच आता हळूहळू विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागत आहेत. यात पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली. लोकसभेत पराभव झालेल्या बारामतीमध्ये १४ जुलैला अजित पवार गटाकडून एका मोठी सभा घेण्यात येणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

"आजच्या बैठकीत दिनांक १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता बारामती येथे अभूतपूर्व अशी जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या जाहीर सभेत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, शेतकऱ्यांच्या वीज माफीची योजना, तरुण - तरुणींना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची योजना, सोयाबीन व कापूस उत्पादकांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय असेल, ई-पिंक रिक्षा, अशा ज्या वेगवेगळ्या योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मार्फत जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत," असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

"मागील आठवड्यात पक्षाच्या विविध सेल, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांची दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेतल्या. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्यासंदर्भात जनतेचे मत काय आहे हे जाणून घेतले. महायुती सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पाचे मोठया प्रमाणात स्वागत करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. याची जाणीव मनात ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता काम करणार आहे," असेही तटकरे म्हणाले.

दरम्यान, उद्या सकाळी ९ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वजण अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयात एकत्र जमणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत महत्वाची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह सर्व मंत्री, आमदार, प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

Web Title: Ajit Pawar led NCP to hold Big meeting rally in Baramati on July 14 after a crushing defeat by Sharad Pawar Supriya Sule Sunetra Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.