जवळच्या सहकाऱ्याने साथ सोडताच अजित पवारांनी विधानसभेसाठीची भविष्यवाणी करून टाकली! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:25 AM2024-07-18T10:25:31+5:302024-07-18T10:27:11+5:30

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या पक्षप्रवेशाने शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे.

Ajit Pawar made a prediction for the Legislative Assembly as soon as ajit gavhane left his party  | जवळच्या सहकाऱ्याने साथ सोडताच अजित पवारांनी विधानसभेसाठीची भविष्यवाणी करून टाकली! 

जवळच्या सहकाऱ्याने साथ सोडताच अजित पवारांनी विधानसभेसाठीची भविष्यवाणी करून टाकली! 

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला असून शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या पक्षप्रवेशाने शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. अजित गव्हाणे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जात होते. गव्हाणे यांनी साथ सोडल्यानंतर अजित पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा घटना होणार असल्याचं म्हटलं आहे.

अजित गव्हाणेंच्या पक्षांतराबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "मला ते काही दिवसांपूर्वी भेटले होते. भोसरी विधानसभेत सध्या भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांना असं वाटलं की महायुतीकडून आपल्याला संधी मिळणार नाही. आता प्रत्येकालाच आमदार व्हायचं आहे. त्यामुळे पुढील काळात अनेक ठिकाणी असं चित्र निर्माण होणार आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी विधानसभेसाठी आपला एक उमेदवार देणार आहे. समोरून देखील महाविकास आघाडी आपला उमेदवार देईल. मात्र त्यांच्यातीलही दुसऱ्या ताकदीच्या नेत्याला वाटलं की आपल्याला इथं संधी मिळणार नाही, त्यानंतर तिथले नेतेही पक्षांतर करतील. अशा पद्धतीचं चित्र आपल्याला विधानसभा निवडणुकीपर्यंत पाहायला मिळू शकतं. याची सुरुवात भोसरी विधानसभेतून झाली आहे," अशा शब्दांत अजित पवार यांनी नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत आपली भूमिका मांडली आहे.

अजित गव्हाणे काय म्हणाले?

अजित पवारांची साथ सोडताना अजित गव्हाणे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "पिंपरी चिंचवडमध्ये २०१७ नंतर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली. त्याअगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. भाजपच्या सत्तेनंतर महापालिका आणि शहर विकासाच्या बाबतीत अधोगतीकडे जाताना दिसून आले. तर भोसरी विधानसभेकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होऊ लागले. एकहाती सत्ता अजितदादांकडे नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली. तसेच आमच्या भोसरी विधानसभेच्या बाबतीत दुर्लक्ष झाले. आता पुढची ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवून विकास करणे गरजेचे आहे. परंतु तसे न होता नुसते पैसे खर्च झाले. पण विकास आम्हाला दिसला नाही. मी आता विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या काही वर्षांपासून मी विधानसभेच्या प्रयत्नात होतो. आता भोसरीचा विकास करण्याची इच्छा असल्याने मी पक्षांतर करत आहे," असं गव्हाणे यांनी स्पष्ट केलं आहे.

कोणकोणत्या नेत्यांनी हाती घेतली तुतारी? 

 माजी महापौर हणमंतराव भोसले, वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे, दिवंगत नगरसेवक दत्ता  साने यांचे पुत्र यश साने, माजी नगरसेवक संजय नेवाळे, वसंत बोराटे, विनया तापकीर,  माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर,  गीता मंचरकर, संजय वाबळे, वैशाली उबाळे, शुभांगी बोराडे, अनुराधा गोफने, घनश्याम खेडेकर, तानाजी खाडे, शशिकीरण गवळी, विजया तापकीर, युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे,  विशाल आहेर, युवराज पवार,  कामगार आघाडीचे विशाल आहेर, नंदूतात्या शिंदे,  शरद भालेकर.

Web Title: Ajit Pawar made a prediction for the Legislative Assembly as soon as ajit gavhane left his party 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.