मुंबई : मी बारामतीला जात असल्याचं म्हणत अजित पवार राष्ट्रवादीच्या बैठकीतून अचानक बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. काँग्रेससोबतची बैठक रद्द झाली. ती पुन्हा कधी होणार नाही, हे माहीत नाही, असं म्हणत अजित पवार बैठक स्थळावरुन बाहेर पडले. मात्र अजित पवार नाराज नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. आता ही अजित पवारांनी केलेली चेष्टाच होती हे पुढे आले आहे.
काँग्रेससोबतची बैठक रद्द झाली असून मी बारामतीला जात असल्याचं सांगत अजित पवार तडकाफडकी निघाले. याबद्दल शरद पवारांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. अजित पवार मुंबईतच आहेत. ते बारामतीला गेलेले नाहीत. उद्या होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला अजित पवार हजर राहतील. बारामतीबद्दलचं विधान त्यांनी चेष्टेनं केलं असेल. ठरवून ते असं म्हणाले असतील, असं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त केली. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनाचा आदर करायला हवा. त्यासाठी काही पथ्यं पाळायला हवीत, अशा शब्दांत पवार यांनी वृत्तवाहिन्यांच्या वृत्तांकनाबद्दल नाराजीचा सूर लावला.
आज संध्याकाळी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार होती. मात्र अजित पवार राष्ट्रवादीच्या बैठकीतून तडकाफडकी निघाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्यासोबत गाडीत होते. काँग्रेससोबतची बैठक रद्द झाल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यावर काँग्रेससोबत पुन्हा बैठक कधी होणार, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारला. या प्रश्नाला माहीत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. मी बारामतीला जात असल्याचं सांगत अजित पवार बैठक स्थळाहून निघून गेले.
मात्र, अजित पवार हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ठरलेल्या ठिकाणी बैठकाला गेले आहेत. या बैठकीला दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, नवाब मलिक, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण व विजय वडेट्टीवार हे नेते आहेत.