Navneet Rana Ajit Pawar: "२०१४च्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. २०१९ला पुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार होते कारण त्यांना नवनीत राणांना पक्षाने तिकीट दिलेले नव्हते. पण ज्यांना आपण पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही", असा खोचक टोला अजित पवार यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना लगावला.
"काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार येईल असे कुणालाच वाटले नव्हते. एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते, आज ममतादीदी भाजपच्या विरोधक आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार कधी भाजपसोबत असतात, कधी भाजपचे विरोधक होतात. त्यामुळे अशा घटना आपल्या इथेच नाही, तर भारतभर घडत असतात. राज ठाकरेदेखील २०१९ निवडणुकांआधी भाजपाविरोधी भाषणे देत होते. पण आता त्यांनी त्यांचा पवित्रा बदललाय", असे अजित पवारांनी नमूद केले.
"मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती, तर राज ठाकरेंनी शरद पवार यांना जातीयवादी म्हटले असते का? राज ठाकरे आज भाषणे करत असताना भाजपवर टीका करत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात. मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपला टार्गेट केले होते. ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. २०१९ ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या होत्या", असा अप्रत्यक्ष टोमणा अजित पवारांनी राज आणि मनसे यांना मारला.