मुंबई : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर रविवारीच मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत होते. पण, अजित पवार न दिसल्याने चर्चा रंगली. शेवटी शाह मुंबईहून रवाना होत असताना अजित पवार विमानतळावर पोहोचले आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह त्यांनी शाह यांच्याशी चर्चा केली.
अजित पवार यांच्यावर शिंदेसेनेतील दोन मंत्री आणि भाजपच्या काही नेत्यांनी जाहीर टीका गेल्याच आठवड्यात केलेली होती. या पार्श्वभूमीवर पवार नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यातच ते आजारी असल्याने राष्ट्रपतींच्या कार्यक्रमांसह काही कार्यक्रमांना उपस्थित राहू न शकल्याने चर्चेला बळकटी आली होती.
मुंबईत आले, पण...अजित पवार रविवारी मुंबईत परतले होते. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गणपतींचे तसेच लालबागचा राजा व आ. आशिष शेलार यांच्या मंडळाच्या गणरायाचे दर्शन अमित शाह यांनी घेतले. यावेळी शिंदे-फडणवीस त्यांच्यासोबत होते. मात्र, अजित पवार सोबत नव्हते.
अमित शाह यांच्यासोबत रविवारी रात्री केवळ भाजप नेत्यांची ती बैठक होती. त्यात वावगे काहीही नाही, पण वेगवेगळ्या अफवा उगीच पसरविल्या जात आहेत. जागावाटपाबाबत अंतिम निर्णय दिल्लीतच होणार आहे. त्या आधी आम्ही तिन्ही पक्ष चर्चा करू. मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, असा शब्द अमित शाह यांनी आम्हाला आजच्या चर्चेत दिला आहे. - खा. सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट