अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासाठी महायुतीची आज सभा होत आहे. बच्चू कडूंच्या उमेदवाराला सभेसाठी मिळालेले मैदान अचानक अमित शाहा यांच्या सभेसाठी देण्यात आल्याने सकाळीत सायन्सकोर मैदानावर राडा पहायला मिळाला होता. पोलिसांनी कडू यांना २४ तारखेला परवानगी दिली होती, परंतु अचानक ती नाकारण्यात आली आहे. अशातच राणा यांच्या सभा मंडपावरील बॅनरवर अजित पवारांचा फोटोच गायब झाल्याने राष्ट्रवादी देखील नाराज झाली आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी राणा यांच्या प्रचार सभेच्या मंडपाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. शाह यांच्या या सभेसाठी मोठा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर एका बाजुला नरेंद्र मोदी आणि राणा यांचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजुला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाह यांचा फोटो आहे. परंतु या अख्ख्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो कुठेच दिसत नाहीय.
नवनीत राणा यांना टॅग करत मिटकरी यांनी राणा या महायुतीचा धर्म विसरल्या आहेत. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे.
मिटकरी यांचे हे ट्विट शरद पवार गटाचे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप रिट्विट करत त्यावर असं नाही.. नीट रडायचं ! मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल, असे म्हणत चिमटा काढला आहे.
दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी मविआच्या सभेत अमरावतीकरांची नवनीत राणांना खासदार करण्यावरून माफी मागितली होती. राणा या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार झाल्या होत्या. आता त्या उमेदवारीसाठी भाजपात गेल्या आहेत. या कारणामुळे अजित पवारांचाही फोटो राणा गटाने बॅनरवर लावला नसल्याची चर्चा होत आहे.