ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 5- सत्तेवर येण्याआधी शेतीच्या उत्पादन किमतीपेक्षा दीडपट जादा दर देण्याची भाषा करणारे सत्तेवर आल्यानंतर 50 पैसे आधारभूत किंमत करून शेतकऱ्यांची टर उडविली. विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्राचे दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असताना दुष्काळग्रस्तांचे आसवे पुसण्यासाठी न येता 'दुष्काळाची नाही तमा, परदेश दौऱ्यातच मजा,' अशा पद्धतीने परदेशवाऱ्या करीत राहिले. हे सरकार नाकर्ते, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या विरोधात असल्याचा घणाघात माजी उपमुख्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे संपर्क प्रमुख अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविवारी अॅग्रो येथील वि. गु. शिवदारे सांस्कृतिक भवनात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री खा. विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे निरीक्षक प्रदीप गारटकर, आ. दिलीप सोपल, आ. बबनराव शिंदे, आ. हुनमंतराव डोळस, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, जि. प. च्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, जि. प. कृषी सभापती पंडित वाघ, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या शिंदे, युवकचे अध्यक्ष रामेश्वर मासाळ, जि. प. सदस्य शिवाजी कांबळे, जि. प. चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, जि. प. चे पक्षनेता धैर्यशील मोहिते-पाटील, राजूबापू पाटील, जि. प. च्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे, बबनराव आवताडे, नगरसेवक जगदीश पाटील, नगराध्यक्ष रमेश बारसकर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 15 हजारांप्रमाणे राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मदत करण्यात आली. दुष्काळात टँकरद्वारे पाणी घालून बागा जगविण्यासाठी शरद पवारांनी पैसे दिले. आताचे हे सरकार जळालेल्या बागालाही पैसे देत नाही. पशुधन जगविण्यासाठी आघाडी सरकारने मोठी मदत केली. छावण्या उघडल्या. पण महायुतीचे सरकार दावण्या रिकाम्या झाल्या. जनावरे कत्तलखान्यात गेली तरी छावण्या उघडायला तयार नाहीत. सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळाची तीव्र दाहकता असतानाही हे मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र करीत बसले. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशात १६ लाख कोटी तर राज्यात ८ लाख कोटी परकीय गुंतवणूक झाल्याचे सांगत आहेत. मात्र त्याचा परिणाम दिसतो का, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला. त्याचा परिणाम झाला असता तर जनतेचे स्थलांतर थांबले असते आणि लोक सुखी राहिले असते. फक्त घोषणेबाजी करून काहीच होत नाही. दुष्काळात जनता होरपळत असताना लक्ष विचलित करण्यासाठी वेगळा विदर्भ आणि वेगळ्या मराठवाड्याचा मुद्दा उपस्थित केला. लोकांना विदर्भ आणि मराठवाडा वेगळा नको आहे. तर त्यांना पाणी, चारा आणि मूलभूत सोयी-सुविधा हव्या आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
बाजार समितीत स्वीकृत सदस्य
आटापिटा करूनही बाजार समितीत भाजपचा प्रवेश होत नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वीकृत संचालकांचा मुद्दा पुढे करीत पाच कोटींपेक्षा कमी बाजार समितीत दोन तर जास्त उलाढाल असलेल्या बाजार समितीमध्ये चार स्वीकृत नगरसेवकांचा शिरकाव करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केला.
लोकशाही विरोधी भूमिका
थेट जनतेतून नगराध्यक्ष व महापौर निवडण्याचा निर्णय हा लोकशाही विरोधी आहे. नगरसेवकातून निवडणून गेल्यानंतर हे पद आपल्याला मिळणार नाही, या भीतीने ते असा षडयंत्र रचत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
विधान परिषदेचा पराभव कमीपणाचा
जिल्ह्यात सगळ्यात जास्त राष्ट्रवादीचे मतदार असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला, ही बाब पक्षासाठी कमीपणा आणणारी आहे. यापुढे असे होऊ नये, म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, अशी सूचनाही अजित पवार यांनी दिली.
जिल्ह्यात माझ्यापेक्षा वजनदार नेते
सोलापूर जिल्ह्यात माझ्यापेक्षा वजनदार नेते आहेत. पण पक्षाच्या वरिष्ठांनी संपर्क प्रमुखाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. यासाठी मी काम करीत आहे. यामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर पक्षाचा विश्वास नाही, असा होत नाही, असा खुलासाही अजित पवार यांनी केला.-----------------------------आतापर्यंत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आदेश मानून काम केले. दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आताही त्यांच्या व पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करीत आहे. आता अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्याची गरज आहे.-खा. विजयसिंह मोहिते-पाटील,माजी उपमुख्यमंत्री----------------------------पूर्वी यशवंतराव, शरद पवारांचा असलेल्या जिल्ह्याची जबाबदारी आता अजित पवारांवर आली आहे. मतभेद ठराविक कालावधीपर्यंत असावे. ओढाओढीचे राजकारण होऊ नये. -आ. दिलीप सोपल,माजी पालकमंत्री