Ajit Pawar vs BJP: “अजित पवार, लगेच विरोधी पक्षनेता पदाचा राजीनामा द्या”, भाजपाने का केली अशी मागणी?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 07:00 PM2022-12-31T19:00:17+5:302022-12-31T19:01:20+5:30
"असं बोलून अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाला डाग लावलाय"
Ajit Pawar vs BJP: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार म्हणतात की, 'छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते…'. अजित पवारांनी असे बोलून जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी केली आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाजपा आध्यात्मिक आघाडीने आक्षेप घेतला आहे.
"अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजित पवार यांना नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत असं बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा. अजित पवार यांचे १४ मे २०१९ चे ट्विट भोसले यांनी दाखवले. अजित पवार २०१९ पर्यंत संभाजी महाराज यांना धर्मवीर मानायला तयार होते. मात्र आता २०२२ मध्ये कशी त्यांना उपरती आली?", असा सवाल भोसले यांनी केला.
‘धर्मवीर’ छत्रपति संभाजी महाराज ❗️🚩🚩🚩
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) December 30, 2022
आम्हां हिंदूंसाठी शंभूराजे सदैव धर्मवीरच ‼️
समस्त हिंदू समाजभावनेचा अपमान करणाऱ्या @AjitPawarSpeaks यांचा धिक्कार !
"माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही प्रश्न विचारायचा आहे की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपली भूमिका बदलणार का? ते अजित पवार यांचा निषेध करणार का? संजय राऊत यांची दातखीळ बसली आहे का? छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले. त्यांच्याबद्दल असं बोलून अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाला डाग लावलाय", असंही तुषार भोसले म्हणाले.