अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:36 AM2024-06-13T11:36:21+5:302024-06-13T11:38:15+5:30

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar NCP chhagan Bhujbal upset over Sunetra Pawars possible candidacy for rajya sabha election 2024 | अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज?

Rajya Sabha Election ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असला तरी राष्ट्रवादीने अद्याप आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र या जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे. या उमदेवारीवरून आता राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण या जागेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतरही काही नेते इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक मतदारसंघातून उमदेवारीसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं नकार दिला अन् अखेर वैतागून भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राज्यसभेसाठीही पक्षाकडून आपल्या नावाचा विचार केला जात नसल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका सर्वांसमोर मांडल्याचे समजते. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.

राष्ट्रवादीतील निर्णयप्रक्रियेवरूनही भुजबळ संतापले?

राष्ट्रवादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे तिघेच निर्णय घेत असल्याची भावना इतर नेत्यांमध्ये तयार झाल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या उमेदवारीबाबतचा निर्णय आधीच झाला होता, तर तो जाहीर करायला उशीर का केला? असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपला संताप व्यक्त केल्याचंही बोललं जात आहे.
 
सुनेत्रा पवार यांच्यासाठी ठराव

पुण्यातील नारायण पेठ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात नुकताच पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्वानुमते एक ठराव मांडण्यात आला. या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

Web Title: Ajit Pawar NCP chhagan Bhujbal upset over Sunetra Pawars possible candidacy for rajya sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.