अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच; राज्यसभेच्या एका जागेसाठी 'या' ४ जणांमध्ये स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 02:04 PM2024-08-14T14:04:54+5:302024-08-14T15:25:47+5:30

राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाली असून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

Ajit Pawar ncp Competition between these 4 persons for one Rajya Sabha seat election | अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच; राज्यसभेच्या एका जागेसाठी 'या' ४ जणांमध्ये स्पर्धा

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच; राज्यसभेच्या एका जागेसाठी 'या' ४ जणांमध्ये स्पर्धा

Rajya Sabha Election ( Marathi News ) : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून गेले असून त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. विधानसभा सदस्यांमधून ते राज्यसभेवर निवडून गेले होते. आता या २ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये एक जागा भाजपला आणि दुसरी जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिली जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाली असून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या जागेसाठी नितीन पाटील, बाबा सिद्दिकी, छगन भुजबळ यांच्या कुटुंबातील एक सदस्य आणि आनंद परांजपे असे चार जण स्पर्धेत आहेत. यातील नितीन पाटील यांना अजित पवार यांच्याकडून लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान वाई येथील जाहीर सभेत राज्यसभेचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे अजित पवार हे राज्यसभेसाठी पाटील यांच्याच नावाचा विचार करणार की पक्षातील अन्य कोणत्या नेत्याला संधी देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजप राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादीला का सोडणार?

सातारा लोकसभेची जागा २०१९ मध्ये राष्ट्रवादीने (श्रीनिवास पाटील) जिंकली होती. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने महायुतीत धरला होता. मात्र, भाजपने उदयनराजे भोसलेंसाठी ही जागा आपल्याकडे घेतली. त्याचवेळी, ‘आम्ही लोकसभेची सातारची जागा भाजपला सोडली. त्या बदल्यात राज्यसभेची उदयनराजेंची जागा भविष्यात रिक्त झाल्यास ती आम्हाला देण्याचा शब्द भाजपने दिला’ असे लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.

Web Title: Ajit Pawar ncp Competition between these 4 persons for one Rajya Sabha seat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.