NCP Ajit Pawar Group News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि तुतारी चिन्ह मिळाले. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले, तर शरद पवार गटाने चांगली मुसंडी मारत अनेक ठिकाणी खासदार निवडून आणले. या पराभवाचे चिंतन करत शरद पवार यांना शह देण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी सज्ज झाली असून, विजयी लय मिळावी, यासाठी रणनीती आखण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी कंबर कसली आहे. पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांचे वर्चस्व मोडून काढण्याकरीता येत्या १४ जुलैला दुपारी १ वाजता बारामतीत अभूतपूर्व अशी जाहीर सभा घेण्याचे ठरवले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिक मजबूत करण्यासाठी अजित पवार हे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार आहेत, असे सांगितले जात आहे.
पुणे जिल्ह्यात वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात तसेच राज्यात इतर ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचाच वरचष्मा दिसून आला. बारामतीत तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून केला जात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढण्यासाठी पक्षाकडून वेगवेगळे कार्यक्रम
अजित पवार यांच्या बारामतीतील जाहीर सभेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, शेतकऱ्यांच्या वीजमाफीची योजना, तरुण-तरुणींना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची योजना, सोयाबीन व कापूस उत्पादकांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय, ई-पिंक रिक्षा अशा सरकारने जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढण्यासाठी पक्षाकडून वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
बैठकांचे सत्र सुरूच
आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. याची जाणीव मनात ठेवत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता काम करणार आहे. मागील आठवड्यात पक्षाच्या विविध सेल, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या दोन दिवस मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासंदर्भात त्यांचे मत जाणून घेण्यात आले. महायुती सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने केलेल्या घोषणा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज
राष्ट्रवादी पक्ष महायुतीतील पक्ष म्हणुन आगामी निवडणुकांना सामोरे जात आहे. राज्य सरकारने ज्या योजनांची घोषणा केलेली आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.