सातारा - फलटण तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना शरद पवारांकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. याठिकाणचे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. येत्या निवडणुकीत दीपक चव्हाण 'तुतारी' चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू समर्थक म्हणून दीपक चव्हाण ओळखले जातात. तालुक्याचा विकास, खोळंबलेली कामे पुढे नेण्यासाठी महायुतीत सहभागी झालो होतो असं विधान आमदार दीपक चव्हाणांनी करत स्थानिक भाजपा नेतृत्वावर तोफ डागली.
आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून मी पक्षात काम करत आहे. २००९ साली मला विधानसभेची संधी मिळाली. २००९ पासून आजपर्यंत ३ टर्म मी फलटण तालुक्याचे मी प्रतिनिधित्व करतोय. सुरुवातीपासून शरद पवारांसोबत काम करतोय. ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा आमच्या सर्वांसमोर धर्मसंकट उभं राहिले. शरद पवारांबाबत जेवढा आदर तेवढाच अजितदादांचा आहे. घरातच फूट पडल्यामुळे नेमका निर्णय काय घ्यायचा हा प्रश्न निर्माण झाला. महाविकास आघाडीत आम्ही अडीच वर्ष सत्तेत होतो. जेव्हा सरकार पडलं तेव्हा आमची जी कामे होती, त्याला तात्काळ स्थगिती दिली. वर्षभर कामे खोळंबली, लोकांच्या मागण्या, तालुक्याचा विकास पुढे करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वात आम्ही महायुतीत सहभागी झालो असं त्यांनी सांगितले.
तसेच महायुती असो वा महाविकास आघाडी कुठल्याही तालुक्यात स्थानिक मतभेद असतात, परंतु ज्याप्रकारे इथले भाजपाचे स्थानिक नेतृत्व आणि आमच्यात मतभेद आहेत, हे वाद स्थानिक पातळीवर असायला हरकत नाही. परंतु भाजपाच्या राज्यातल्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या लोकांना नको तेवढी ताकद मिळते. त्या ताकदीचा वापर आमच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी होतो. त्यामुळे आमच्या सहनशीलतेचा अंत झाला म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. मी राजीनामा ईमेल केला आहे, उद्या प्रत्यक्षात राजीनामा देईन. कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेतला आहे. अजितदादांशी आमचं काही बोलणं झाले नाही. आम्ही अजितदादांची वेळ मागितली होती, कार्यकर्त्यांचे म्हणणं त्यांच्यासमोर मांडले, त्यांच्या भावना दादांकडे पोहचल्या, वरिष्ठ पातळीवर मी बोलतो असं अजितदादा म्हणाले, परंतु पुढे काहीच फरक पडला नाही. मला थांबवण्यासाठी काही प्रयत्न झाले नाही, कुणाचा फोनही आला नाही असं आमदार दीपक चव्हाण यांनी म्हटलं.
दरम्यान, कार्यकर्त्यांची चर्चा करूनच आम्ही पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांची भावना, सर्वसामान्य जनतेमध्येही ती भावना होती, शरद पवारांकडे पुन्हा गेले पाहिजे. लोकशाहीत जनतेचे, कार्यकर्त्यांचा कल लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. शरद पवार हे आमचे नेते आहेत, त्यामुळे कौटुंबिक भेट असते तेव्हा स्वागत करणे संस्कृती आहे. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे पवारांच्या भेटीत होते. भाजपाच्या वरिष्ठांसोबत काही वाद नाहीत हे रामराजे म्हणालेत, परंतु इथला जो कुणी उमेदवार असेल तो राखीव आहे, त्याला भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाची साथ आहे. पडद्यामागे आमचे विरोधक असणार आहे, त्यामुळे रामराजे हे स्थानिक भाजपा नेतृत्वाला विरोधच करतायेत असं सूचक विधानही आमदार दीपक चव्हाण यांनी केले आहे. आज फलटण येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आली होती, त्या समारंभात संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण हजर होते. त्याआधी निंबाळकरांच्या घरी रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि शरद पवारांची बैठक झाली.