निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 04:30 PM2024-10-15T16:30:00+5:302024-10-15T16:33:03+5:30
महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहाजी पाटील हे महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील.
सोलापूर - राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून येत्या २० नोव्हेंबरला राज्यात मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागेल. निवडणूक आयोगाने आज कार्यक्रम घोषित केल्यानंतर आता राज्यातील राजकीय पक्षात उलथापालथी पाहायला मिळणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत येत्या निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत.
दीपक साळुंखे म्हणाले की, जनता हाच माझा पक्ष आहे. तालुक्यातील जनतेनं मला निवडणुकीत उभं राहण्याचा आग्रह धरला. विधानसभा निवडणुकीसाठी मी उमेदवार असणार आहे. गेली ३०-३५ वर्ष गणपतराव देशमुखांना आमदार करण्यात माझी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. २०१९ च्या निवडणुकीत पक्षभेद विसरून मी शहाजी पाटलांना मदत केली होती. त्यामुळे शेकापचे अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख आणि शहाजी पाटील यांनी माझ्यासाठी ही निवडणूक सोडून द्यावी असं आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच मी कोणत्याही परिस्थितीत यंदाची निवडणूक लढवणार आहे, त्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष मदत करण्यास तयार असल्यास मी त्याचा विचार करेन. विधानसभा निवडणुकीत मी उभं राहणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे. येत्या विधानसभेला मी अपक्ष निवडणूक लढवेन, शेकाप आणि शहाजी पाटलांना याआधी मी मदत केली, यंदा त्यांनी मला मदत करावी असं माजी आमदार दीपक साळुंखे यांनी म्हटलं आहे.
सांगोला विधानसभेत सध्या शिवसेना शिंदे गटाचे शहाजी पाटील हे आमदार आहेत. महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहाजी पाटील हे महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील. परंतु या मतदारसंघात दीपक साळुंखे निवडणुकीची तयारी करत आहेत. मागील निवडणुकीत शहाजी पाटील यांचा निसटता विजय या मतदारसंघात झाला, त्यावेळी शेकापकडून शहाजी पाटलांना मोठी टक्कर देण्यात आली होती. तेव्हा दीपक साळुंखे यांनी शहाजी पाटलांना मदत केली होती. शहाजी पाटील यांच्याविरोधात ही जागा मविआत ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीपक साळुंखे हे ठाकरे गटाशीही संपर्क करत असल्याची माहिती समोर आली आहे.