अजितदादांचं 'ठरलंय'?; एकसारखाच चेंडू टाकत सीनिअर अन् ज्युनिअर ठाकरेंची काढली 'विकेट'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 03:53 PM2020-01-20T15:53:48+5:302020-01-20T15:58:20+5:30
अजित पवारांचा 'स्पीड'च सीनिअर आणि ज्युनिअर ठाकरेंसाठी 'स्पीडब्रेकर' ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली, तेव्हा राजकीय वर्तुळात दोन प्रश्नांची चर्चा सुरू होती. नेमस्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देधडक-बेधडक अजितदादांचं सूत जुळेल का? आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणूनही पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुतण्यालाच उपमुख्यमंत्री कसं काय केलं बरं?, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु, या प्रश्नांची उत्तरं आता हळूहळू मिळू लागली आहेत. गेल्या आठवड्यात अजित पवारांनी एकाच वाक्यात ठाकरे पिता-पुत्राची, अर्थात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची विकेट काढल्याचं पाहायला मिळालं आणि 'दादां'ना 'काकां'नी उपमुख्यमंत्रिपदाचं बक्षीस का दिलं असेल, याचा अंदाज आला.
अजित पवारांनी पदभार स्वीकारल्यापासूनच, आपल्या स्वभावाला अनुसरून कामांचा धडाका लावला आहे. वेगवेगळ्या विषयांवर सरकारची भूमिका मांडताना तेच दिसताहेत. मग तो इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय असो, पुणे मेट्रोचा असो, बारामतीतील गॅसपुरवठ्याचा असो किंवा साईबाबा जन्मस्थळावरून पेटलेल्या वादाचा; अजित पवारांचे 'बाईट' माध्यमांमध्ये झळकत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचा उल्लेख गमतीनं 'स्टेपनी' असा केला असला; तरी अजित पवारांची 'पॉवर' आणि प्रशासनावर असलेली पकड पाहून, आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडेच असल्याचं उद्धव ठाकरे यांनी बारामतीत म्हटलं. त्यांच्या बोलण्याचा सूर थोडा मिश्किल होता, पण सध्या तरी दादांची गाडी सुस्साट धावताना दिसतेय. हा 'स्पीड'च सीनिअर आणि ज्युनिअर ठाकरेंसाठी 'स्पीडब्रेकर' ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरेंनी सूतोवाच केलेली श्वेतपत्रिका आणि आदित्य ठाकरेंचं 'पेट प्रोजेक्ट' असलेल्या नाईटलाईफबद्दल अजितदादांची वेगळी मतं असल्याचे संकेत नुकतेच मिळाले.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा झाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आर्थिक शिस्त बिघडल्याचा दावा करत, आमचं सरकार गेल्या पाच वर्षांतील आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका काढणार असल्याचं माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर, जे काही आहे आणि होते ते श्वेतपत्रिकेत येईलच, असं उद्धव ठाकरेही म्हणाले होते. परंतु, अर्थमंत्री अजित पवार यांनी श्वेतपत्रिकेचा हा विषय गुंडाळूनच टाकलाय. आपल्यापुढे इतर महत्त्वाचे विषय असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं.
अगदी हेच उत्तर अजित पवारांनी पुण्यातील नाईटलाईफबाबतच्या प्रश्नावरही दिलं. मुंबईप्रमाणेच पुण्यात नाईटलाईफला परवानगी देणार का, असा प्रश्न त्यांना पालकमंत्री या नात्याने विचारण्यात आला होता. त्यावर, सध्या या प्रस्तावापेक्षा आमच्याकडे महत्त्वाची कामं आहेत, असं म्हणत त्यांनी या विषयाची फाईलही बंदच करून टाकली. दुसरीकडे, राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हेही मुंबईतील नाईटलाईफच्या अंमलबजावणी फारसे सकारात्मक नाहीत. पोलिसांवरचा ताण आणि मनुष्यबळाचा मुद्दा मांडत त्यांनीही हा विषय लांबणीवर टाकण्याचाच प्रयत्न केला आहे. अर्थात, आदित्य ठाकरेंच्या फोननंतर त्यांची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचं समजतं.
सगळी महत्त्वाची खाती स्वतःकडे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं 'ठाकरे सरकार'वर आपलाच अंकुश राहील, याची पूर्णपणे तजवीज केल्याची चर्चा खातेवाटपापासूनच आहे. त्यावर, संजय राऊत यांनी शिवसेनेचा बचाव केला. सगळ्या फाईल या मुख्यमंत्र्यांकडेच येतात आणि त्या पदावर उद्धव ठाकरे आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु, अजित पवार यांची फायली हातावेगळ्या करण्याची हातोटी पाहता, त्यांची फाईल हाताळणं ठाकरेंना जरा जड जाऊ शकते. त्याची चिन्हं दिसू लागली असून पवारांचं प्लॅनिंगही हळूहळू कळू लागलंय.
दरम्यान, सत्ताधारी आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात विविध विषयांवर खटके उडताना दिसत आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटींबाबत संजय राऊत यांनी केलेलं विधानावरून ठिणगी पडली होती. अशा प्रकारची विधानं यापुढे सहन करणार नाही, असा इशाराच महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला होता. त्यानंतर, वीर सावरकरांबद्दल राऊतांनी केलेलं विधानही काँग्रेसला रुचलेलं नाही. अशातच, शिवसेनेनं २०१४ मध्येही काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेची कोंडी केली आहे. या सगळ्या शब्दयुद्धापासून राष्ट्रवादी काहीशी दूर आहे, पण मंत्र्यांचे दौरे, घोषणा, कार्यक्रम, जनतेशी संवाद यात त्यांनी बाजी मारल्याचं चित्र आहे.
संबंधित बातम्या
इंदिरा गांधी-करीम लाला भेटः काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राऊतांची माघार
सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोधच : वडेट्टीवार
भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने तेव्हाही आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता - पृथ्वीराज चव्हाण
आमचं सरकार एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही : अशोक चव्हाण