राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगात आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रकारच्या घोषणाही दिल्या जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं, तो सेफ हैं' या घोषणांची राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एकीकडे योगींच्या "बटेंगे तो कटेंगे" या घोषणेचा विरोध केला असून दुसरीकडे मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक है, तो सेफ है" घोषणेचे समर्थन केले आहे.
अजित पवार म्हणाले, "देश एक राहिला तर सेफ राहील, यात काय खराबी आहे. काहीच नाही. आपण सर्वजण एक राहिलो तरच सेफ राहू. यात काय खराबी आहे. यात काय अडचण आहे. मला तर यात काही चुकीचे वाटत नाही. 'सबका साथ सबका विकास', सर्वांचा... सर्वांचा... सर्वांचा विकास. तसेच आपण सर्वजण एक राहिलो तर सेफ राहू." यावर 'बटेंगे तो कटेंगे'? असे विचरले असता, पवार म्हणाले, "हे चुकीचे आहे, काय 'बटेंगा कटेंगा', असे शब्द महाराष्ट्रात वापरण्यात काही अर्थ नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्रातील लोकांचा विचार वेगळा आहे. कदाचित, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश येथील लोकांचा विचार वेगळा असू शकतो. तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात असे चालत नाही."
"आमच्या महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले आंबेडक यांची विचारधारा, शिव म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा चालते. ही विचारधारा कुणी सोडली तर महाराष्ट्र त्याला स्वीकार करणार नाही," असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, भाजप नेते योगी आदित्यनाथ आपल्या रॅलींमध्ये 'बाटेंगे तो कटेंगे'चा नारा देत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं, तो सेफ हैं’, असा एकतेचा संदेश देत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच, जाती-जातीत भांडण लावणे हा काँग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. SC, ST आणि OBC समाजाची प्रगती व्हावी आणि त्यांना योग्य सन्मान मिळावा, असे त्यांना वाटत नाही. लक्षात असू द्या, 'एक है, तो सेफ है' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.