पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसने पक्षाच्या झेड्यांबरोबरच आता छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला भगवा झेंडाही पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये फडकावण्याचा आदेश अजित पवारांनी नुकताच दिला. शिवसेना-भाजपाच्या शिवप्रेमाला आणि भगव्या झेंड्याच्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच हिणवले. त्यामुळेच भाजप-शिवसेनेच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या राष्ट्रवादीच्या या नव्या भगवेकरणावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका राजकीय असल्याची टीका सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मात्र हा निर्णय ह्यदेर आये, दुरुस्त आये, असा वाटतो आहे.विशेष म्हणजे अजित पवारांनी स्वत: या संदर्भात जाहीर आदेश दिला असला तरी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या संदर्भात कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते पक्ष सोडून भाजप व शिवसेनेत प्रवेश करु लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राष्ट्रवादी चा भगवा झेंडाही फडकविण्याचा निर्णय नुकताच जाहिर केला. पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे यांनी '' लोकमत'' ला सांगितले, की शिवाजी महाराज व भगवा झेंडा हा केवळ शिवसेनेचाच आहे असा समज चुकीचा असून, तो भागवत संप्रदायाचा भगवा झेंडा आहे़ त्या भगव्याच्या पाठीमागे एक श्रध्दा व आत्मियता आहे़ याच आत्मयितेने या झेंड्याचा स्विकार केला गेला आहे़ इतक्या दिवस आम्ही हा झेंडा वापरला नाही असे काही नाही़ सध्याच्या परिस्थिती शिवसेनेकडून आम्हीच केवळ या भगव्याचे वारस असल्याचे भासविले जाते ते चुकीचे असून, भगव्याच्या प्रती आदर व छत्रपतींची अस्मिता आमच्यातही ठासून भरली आहे़. केवळ त्याचे प्रदर्शन कधी केले नाही़ सध्याच्या परिस्थितीत सेना व भाजपचा ज्याप्रकारे राजकारण करीत आहे. त्यामुळे त्यांना तोंड देण्यासाठी केवळ मनातील या सुप्त भावना या भगव्या झेंड्याच्या माध्यमातून आम्ही मांडल्या आहेत़. आमच्या पक्षाच्या दौर्यात, कार्यक्रमात आम्ही या दोन्ही झेंड्याचा वापर सुरू केला असून, यातून राजकीय लाभ घेण्याचा आमचा कुठलाही विचार नाही.लोकांनी यातून काय बोध घ्यायचा तो घ्यावा़ मतांच्या राजकारणांसाठी हा निर्णय घेतला असे बोलणे चुकीचे आहे़. शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही कधीही मते मागणार नाही, असा दावा काकडे यांनी केला़. ..............बुडत्याला भगव्याचा आधार राष्ट्रवादीला या भूमिकेचा नक्की फायदा होईल, अशी शक्यता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी व्यक्त केली़ ते म्हणाले, भारतीय राजकारणातील परिस्थितीचा कल सध्या हिंदुत्वाचा व राष्ट्रवादाचा आहे़. याच्याशी आपण जुळवून घेतले तर नवीन मतदार आपल्याकडे येतील असे राष्ट्रवादीला वाटत आहे़. भारतीय राजकारणात ''भगवा ध्वज'' म्हणजे हिदुंत्व असा अर्थ आहे़. राष्ट्रवादीने भगवा ध्वज स्विकारला असला तरी तो शिवाजी महाराजांचा आहे़.
राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेचे भगवे ध्वज वेगळेवेगळे असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे़. हिंदुत्व या प्रकारचा शिवाजी त्यांना नको असून, हिंदू शिवाजी म्हणून हवा आहे, हेच या झेंड्यातून प्रतित होत आहे़. हिंदू चौकटीत आपले वर्तन करणाऱ्या ओबीसी व मराठा यांना जुळविण्यासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे़. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी आणि काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणातच नाही, अशी जी परिस्थिती निर्माण झाली होती. ती या निर्णयामुळे बदलेल़ तसेच आ.हे त्या जागा तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील अशी शक्तता पवार यांनी व्यक्त केली़.