मुंबई: जवळपास 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार होणार असल्याचे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.
काल अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळाल्याबद्दल मीडियाने संजय राऊत यांना प्रश्न विचारला. यावर संजय राऊत म्हणाले, 'अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून क्लीन चीट मिळाल्याचा आनंदच आहे, ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत', असे राऊत म्हणाले. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळविस्तार होणार असून यामध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सिंचन घोटाळाप्रकरणी एसीबीने अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. अजित पवार हे विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार नाहीत, हे एसीबीने पुन्हा एकदा सांगितले असून यासंदर्भात महासंचालक परमवीरसिंग यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले.
अजित पवारांना क्लीन चीट कशी? - फडणवीसकोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हायकोर्टात सादर केलेले प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारे असून मंत्र्यांची जबाबदारी अधिका-यांवर टाकण्याचा हा प्रयत्न आहे. अजित पवारांना कशाच्या आधारे क्लीन चीट देण्यात आली आहे, असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
...तर 23 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार करू- अजित पवारमंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पवारसाहेबांनी दोन दिवसांपूर्वी सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक घेतली होती. शरद पवार साहेबांनी सांगितले की, नागपूरचे अधिवेशन संपेपर्यंत मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर सहा मंत्री काम करतील. नागपूरचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 21 तारखेला अधिवेशन संपत आहे, 22 तारखेला सुट्टी आहे आणि 23 तारखेला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते.
(अजित पवार निर्दोष; सिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीची 'क्लीन चिट')