राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढील निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत लढणार आहे. घडाळ्याच्या चिन्हावर लढणार असल्याची घोषणा नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. याचबरोबर शरद पवारांचा पाठिंबा आहे का या प्रश्नावर राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेत्यांचा आशिर्वाद, सर्व म्हणजे सगळे आले, असे वक्तव्य केले आहे.
अजित पवारांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणणाऱ्या शरद पवारांच्या शिडातील हवाच काढून घेतल्याचे चित्र आहे. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपासोबत का नाही अशी भूमिका मांडत अजित पवारांनी त्यांची दिशा स्पष्ट केली आहे.
विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असं मत माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं झालं. त्यातच, गेल्या ९ वर्षात नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, ज्याप्रमाणे विकासाचं काम केलंय, ते पाहता त्यांच्यासोबत जायला हवं, असं आमचं मत आहे. देशाच्या राजकारणात आज सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन नरेंद्र मोदींना विरोध केला आहे. त्यामुळेच, ही राजकीय परिस्थिती पाहता, आम्ही मोदींसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच या सत्तेत, सरकारमध्ये सहभागी झालो आहे. यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. चार दिवसांपूर्वीच शरद पवारांनी मोदी पुन्हा पंतप्रधान पदी निवडून येणार असे म्हटल्याचे भुजबळ म्हणाले.