राज्यपालांच्या अभिभाषणवरील प्रस्तावावर विधानसभेत बोलताना आज मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांच्याबाबतही मोठं विधान केलं. अजितदादा लोक तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुम्ही एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री व्हाल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. अजितदादा यांचे समर्थक नेहमीच भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव समोर करत असतात. मात्र पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यांना कधी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वाधिक वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर झाला आहे. अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधीवेळी विक्रमी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
दरम्यान, राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भूषवणारी व्यक्ती कधी महाराष्ट्राची मुख्यमंत्री होऊ शकलेली नाही, असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात असे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्रिपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे उपमुख्यमंत्री पुढे जाऊन राज्याचा मुख्यमंत्री बनू शकत नाही हे मिथक खोटं ठरलं आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामधून अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. अजितदादा लोक तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत की तुम्ही एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री व्हाल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.