एक प्रश्न अन् पत्रकार परिषदेतच अजित पवारांनी अधिकाऱ्याला लावला फोन, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:13 IST2025-01-09T17:12:30+5:302025-01-09T17:13:04+5:30
मी शिक्षण विभागाच्या सचिवांशीही बोलतो. पगार कुणाचे रखडणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं अजित पवारांनी सांगितले.

एक प्रश्न अन् पत्रकार परिषदेतच अजित पवारांनी अधिकाऱ्याला लावला फोन, त्यानंतर...
पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासकीय कामाचा धडाका अनेकदा दिसून येतो. सकाळी ६ वाजताच अजित पवार विकासकामांच्या पाहणी दौऱ्यावर पोहचतात. त्याशिवाय एखादं काम अपूर्ण किंवा योग्य नसेल तर अजितदादा अधिकाऱ्यांनी कान उघडणी करतात. अजित पवारांच्या कामाबाबत बऱ्याचदा लोकांनी कौतुक केले आहे. आज पुण्यात सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा अजित पवारांच्या या कामाचा अनुभव पत्रकारांना आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे पगार झाले नाहीत त्यामागचे कारण अजित पवारांना विचारले. तेव्हा अजित पवारांनी तातडीने वरिष्ठ सचिव ओ.पी गुप्ता यांना फोन लावण्यास सांगितले. कधी कधी काही प्रश्न असे विचारले जातात ज्यात काही तथ्य नाही. उगीच काहीतरी उठवायचे. उलट या सर्व काम करणाऱ्यांचे पगार वेळेत झाले पाहिजेत. त्यात विलंब करण्याचं काही कारण नाही. तरीदेखील मी अधिकाऱ्यांना विचारतो हे का झाले नाहीत आणि झाले असतील तर प्रश्नच नाही असं त्यांनी म्हटलं.
त्यानंतर स्वीय सहाय्यकांनी ओ.पी गुप्ता यांना फोन लावून तो अजितदादांकडे दिला. तेव्हा अजितदादांनी त्यांच्या शैलीत गुप्ता यांना आपल्या इथं शिक्षकांचे पगार झाले नाहीत? असा प्रश्न केला. त्यानंतर समोरून उत्तर ऐकल्यानंतर हो, आलं लक्षात म्हणून फोन ठेवून दिला. अधिकाऱ्यांनी म्हटलं की, आपण पगाराचे पैसे विभागाला उपलब्ध करून दिले आहेत. ज्या त्या विभागात पगार देत असताना त्यांच्याकडे काही त्रुटी अंतर्गत समस्या असेल त्यामुळे विलंब झाला असेल. अर्थ विभागाने सगळ्यांचे पैसे दिलेत. मी शिक्षण विभागाच्या सचिवांशीही बोलतो. पगार कुणाचे रखडणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं अजित पवारांनी सांगितले.