Ajit Pawar | कोकणाच्या लोकांना गोष्टी ऐकायला नि सांगायला फार आवडतात- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 06:25 PM2023-01-09T18:25:16+5:302023-01-09T18:26:29+5:30

मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मांडलं मत

Ajit Pawar praises Konkan Man NCP MP Sunil Tatkare for great visionary career as politician  | Ajit Pawar | कोकणाच्या लोकांना गोष्टी ऐकायला नि सांगायला फार आवडतात- अजित पवार

Ajit Pawar | कोकणाच्या लोकांना गोष्टी ऐकायला नि सांगायला फार आवडतात- अजित पवार

googlenewsNext

Ajit Pawar on Konkan: कोकणातील लोकांना गोष्टी ऐकायला आणि सांगायला फार आवडतात. कोकणी माणसांचा गोष्टी वेल्हाळपणा तटकरे यांनी पुरेपूर उचलला आहे. विधीमंडळ किंवा विधीमंडळाच्या बाहेरची भाषणे ऐकल्यावर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व याची सगळ्यांना खात्री पटते, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे तोंडभरून कौतुक केले. सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या 'अभिनंदन... अभिवादन' या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत झाले. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विधीमंडळातील भाषणे ऐकली तर माझ्यासारख्या अनेकांच्या लक्षात आले की, हातामध्ये कागदाची एक चिठ्ठी न घेता तासभर ओघवतं भाषण करण्याची तटकरेंची शैली आहे. सुनील तटकरे यांची अनेक भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहे. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

"सुनील तटकरे यांची भाषणे ही सगळीच अभ्यासपूर्ण व भावस्पर्शी अशाप्रकारची होती. त्यांच्या असंख्य भाषणातून मोजकीच भाषणे या पुस्तकात निवडण्याचे अवघड काम केले गेले आहे. तटकरे यांच्या चाहत्यांना या एका पुस्तकातून आपण न्याय देऊ शकू ती गोष्ट अशक्य आहे. पुस्तक प्रकाशनाचा केलेला कार्यक्रम हा निश्चितच कौतुकास्पद आहे. तटकरे यांना न्याय देण्यासाठी एखादा महाग्रंथ देखील अपुरा पडेल असे मला वाटते. भविष्यात प्रयत्न केला तर महाग्रंथात रुपांतर करण्यास हरकत नाही. त्याग, अनुभव आणि वक्तृत्वशैली आहे म्हणून भाषणे चांगली होतात असे नाही तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल विचार मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल आपल्या मनात निष्ठा, कणव, कळवळा असला पाहिजे तरच भाषणे भावस्पर्शी होतात," अशी स्तुतिसुमने अजित पवारांनी तटकरे यांच्यावर उधळली.

"जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण आहे त्याप्रमाणे त्यांना लोकांची कामे करण्याची खोड लागली आहे. ते दिल्लीत असले तरी त्यांचे बारीक लक्ष रायगड जिल्ह्यातील गाव तालुका इथे असते. सुनील तटकरे यांना एकदा अपयश मिळाले तरी खचून न जाता ते पुढे जात राहिले आणि ते मंत्री, पक्षाचे प्रमुख नेते आहेत आता दिल्लीत खासदार म्हणून चांगल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. अलीकडचा अपवाद वगळता कोकणाला सातत्याने चांगले, अभ्यासू, विद्वान अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत त्यामध्ये आदरणीय मधु दंडवते, बॅ. नाथ पै, सुरेश प्रभू अंतुले यांच्या सारख्यांनी महाराष्ट्राचा कोकणचा गौरव राजधानी दिल्लीत वाढवला, तेच काम आता सुनील तटकरे करत आहेत. महाराष्ट्राचा गौरव आणखी पुढे न्यावा वाढवावा," अशी प्रेमळ अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. 

Web Title: Ajit Pawar praises Konkan Man NCP MP Sunil Tatkare for great visionary career as politician 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.