अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:01 PM2024-10-09T13:01:17+5:302024-10-09T13:02:23+5:30
बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी केलेल्या विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगणे कठीणच आहे. विधानसभा निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात अशावेळी महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपावरून वाद समोर येत आहेत. त्यातच महायुतीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत रोहित पवारांचं कौतुक केले, त्याशिवाय शरद पवारांच्या संमतीनेच माझी राजकीय भूमिका ठरली असं विधान केले. त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अजित पवार म्हणाले की, राजकारणाची गोडी होती म्हणून मी राजकारणात आलो. माझ्यावर साहेबांनी जबाबदारी टाकली, त्यानंतर सुप्रिया सुळेला वाटलं आपणही या क्षेत्रात यावे. गेल्या टर्मला रोहितही आला. तेव्हा रोहितला म्हटलं इथं पुणे जिल्ह्यात नको, तु शेजारच्या जिल्ह्यात जा कर्जत जामखेडला, नाहीतर लोक म्हणतील यांच्याशिवाय दुसरं कुणी दिसतंय की नाही. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांनी चांगले काम चालवलं आहे असं त्यांनी सांगितले. बारामतीतील एका डॉक्टरांच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
त्याशिवाय आता २ पक्ष झालेत, दोन्ही बाजूची पवार मंडळी लोकांना भेटायला लागलीत, साड्या द्यायला लागलेत. टिफिनचे डबे द्यायला लागलेत. पुरुष मंडळी असेपर्यंत घर एक असते, परंतु एकदा...असं सांगत त्यांनी वाक्य अर्धवट ठेवले आणि पुढे नवरात्र आहे स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे असं म्हटलं त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. मला काही राजकीय भूमिका घ्यायची होती ती साहेबांना विचारून घेतली. साहेब पहिल्यांदा हो म्हणाले नंतर त्यांनी म्हटलं हे काही योग्य नाही. हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुढे गेलो. मात्र हे होताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही कारण आम्ही कुटुंब एक होतो असंही अजित पवारांनी भाषणात सांगितले.
दरम्यान, मी काही ठिकाणी सुतोवाच केलं होत, ते तुम्ही बघितलं होत. काही डॉक्टरांनी पण मला फोन करून सांगितलं काय तुमच्या मनामध्ये, म्हणालो काही नाही बाबा, शेवटी कुठं ना कुठं थांबाव लागतं.जसं आता डॉक्टर राजे थांबलेच आहेत. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या पेशंटला सांगा काही काळजी करू नका. १९६७ पासून काही मिळालं नाही, आता देत आहेत तर आता घ्या मिळालं तेवढं. काहीच सोडू नका. यांना पण इतकी वर्ष मत देत आलोय, आता काय होतय दिलं म्हणून असं तुम्ही तुमच्या पेशंटला सांगा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.