Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी हाय प्रोफाईल लढती पाहायला मिळणार आहेत. यात अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. येथे अजित पवार vs युगेंद्र पवार मैदानात आहेत. एकीकडे अजित पवार पत्नी आणि मुलांसह प्रचार करत आहेत, तर दुसरीकडे शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब युगेंद्रसाठी मैदानात उतरले आहे. यामध्ये शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांचाही समावेश आहे. यावर आता अजित पवारांनी थेट भाष्य केले.
युट्यूब चॅनेल बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांना विचारण्यात आले की, यंदाच्या निवडणुकीत तुम्ही स्वतःसाठी खूप प्रचारसभा घेत आहात. तुम्हाला पराभवाची भीती असल्याची टीका विरोधक करत आहेत. यावर अजित पवार म्हणाले, "प्रचार करण्याचा मला अधिकार आहे, त्यामुळे मी प्रचार करतोय. दिवाळीच्या काळात मला भरपूर वेळ मिळाला, त्यामुळे मी माझ्या मतदारसंघात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि संवाद साधला. विरोधकांना काय वाटतं, ह्याच्याशी मला काही देणं-घेणं नाही."
प्रतिभाकाकींना पाहून आश्चर्य वाटलं..."पवारसाहेबदेखील युगेंद्रसाठी अनेकांना भेटी देत आहेत. मलातर आश्चर्य वाटलं, मला आईसमान असलेल्या आमच्या प्रतिभाकाकी गेल्या 40 वर्षांपासून घरोघरी जाऊन प्रचार करत नव्हत्या. परंतु, त्या आता घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. अजितला पाडण्याकरता प्रचार करताय का ? आम्हा सर्व मुलांमध्ये मी काकींच्या सर्वाधिक जवळ राहिलेलो आहे. त्यामुळे मी भेटल्यानंतर त्यांना याबाबत विचारणार आहे."
पवारसाहेब, हा दुजाभाव का?"सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीला, माझ्या निवडणुकीला प्रतिभाकाकी कधीच एवढ्या फिरल्या नाहीत. 1990 पर्यंत त्या पवारसाहेबांच्या प्रचारसभेला जायच्या. परंतु, त्यानंतर त्यांनी प्रचार केला नाही. फक्त निवडणुकीच्या शेवटच्या सभेला त्या यायच्या, बाकी कधी यायच्या नाहीत. त्यादिवशीही मला आश्चर्य वाटलं. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. पण आतापर्यंत मी सातवेळा विधानसभेचा अर्ज भरला, एकवेळा लोकसभेचा अर्ज भरला, सुप्रियाने चारवेळा अर्ज भरला, पण शरद पवार कधीही उमेदवारी अर्ज भरायला आले नाहीत. परंतु, परवा युगेंद्रसाठी ते स्वतः गेले. रोहितनेही फॉर्म भरला, पण पवार साहेब तिथे गेले नाहीत. हा दुजाभाव का? मनात शंका येते," असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
बारामतीकरांनी माझ्याकडे पाहून निवडून द्यावंलोकसभेला मी जी चूक केली, तीच चूक त्यांनी करायला नको होती. त्यांनी सामंज्यस्याची भूमिका घ्यायला हवी होती. मी इतक्या वर्षांपासून बारामतीचं प्रतिनिधीत्व केलं, चांगला विकास केला. आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यात बारामतीसह आमच्या उमेदवारांच्या मतदारसंघात काय काम केलं आणि पुढे काय करणार, हे सांगितलं आहे. आमचे व्हिजन आहे, त्याप्रकारे पुढे जायचं आहे. मला माझ्या मतदारांवर विश्वास आहे. त्यांनी लोकसभेला पवारसाहेबाकडे पाहून सुप्रियाला निवडून दिलं. आता त्यांनी माझ्याकडे पाहून मला निवडून द्यावं आणि खुश करावं, असं आवाहनदेखील त्यांनी यावेळी केलं.
स्वतः इतके वर्षे काम केले अन् मला रिटायर व्हायला सांगतातशरद पवारांनी अलीकडेच त्यांच्या निवृत्तीबाबत एक वक्तव्य केलं, त्याबाबत अजित पवारांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, शरद पवार आता म्हणतात की, ते यापुढे कोणत्याही निवडणुकीत उभे राहणार नाहीत. ते माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे आहेत. ते 84 वर्षांचे आहेत आणि ते मला आता रिटायर करायला निघालेत. ते स्वतः मात्र 84 पर्यंत काम करू शकतात, हा कोणता न्याय? तुम्ही इतके वर्ष काम करता, मी कशा कमी आहे? असाही सवाल अजित पवारांनी विचारला.