लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र २ अंतर्गत राज्यात १ लाख ८९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल आणि त्याद्वारे ३ लाख ३० हजार जणांना रोजगार मिळेल, असा वादा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव दिले आहेत. विविध बँकांनी त्यापैकी ९६२१ प्रस्ताव मंजूर केले असून, ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. येत्या वर्षी ३० हजारांहून अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे एक लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील, असे आशादायी चित्र अर्थसंकल्पात रंगविण्यात आले आहे.
आदिवासी औद्योगिक क्लस्टरआदिवासी समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन व आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नाशिक जिल्ह्यांतील दिंडोरी येथे आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारण्यात येणार आहे.
नांदेडच्या खादी केंद्रासाठी २५ कोटींची तरतूदस्वातंत्र्यसैनिक स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी १९६७ मध्ये नांदेड येथे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी त्यानंतर या संस्थेचा विस्तार केला. येथे तयार झालेले राष्ट्रध्वज मंत्रालयासह संपूर्ण देशात वापरले जातात. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खादी ग्रामोद्योग केंद्राच्या या इमारतीची पुनर्बांधणी व विक्री केंद्र उभारणीसाठी २५ कोटी रुपये दिले जातील.
२०२५ पर्यंत पाच हजार चार्जिंग सेंटरई-वाहन धोरणांतर्गत राज्यात २०२५ पर्यंत पाच हजार चार्जिंग सेंटर उभारले जातील. तोवर नवीन वाहन नोंदणीत इलेक्ट्रिक वाहनांचा हिस्सा १० टक्के व मोठ्या शहरांमधील सार्वजनिक वाहतुकीचा हिस्सा २५ टक्के असेल.
पं. रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजनापंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना राज्यात राबविली जाईल. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी या योजनेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची १०० टक्के परतफेड करण्यात येईल.
सौर ऊर्जा प्रकल्प मौजे कौडगाव व मौजे शिंदाळा (जि. लातूर), मौजे साक्री (जि. धुळे), वाशीम, मौजे कचराळा (जि.चंद्रपूर) आणि यवतमाळ येथे एकूण ५७७ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. याशिवाय राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क विकसित करण्यात येणार आहेत.
डॉ. आंबेडकर जीवनप्रकाश योजनाअनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींच्या घरासाठी प्राधान्याने व स्वस्तात वीज जोडणी उपलब्ध करुन देण्यासाठीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेस ६ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऊर्जा विभागाला आगामी आर्थिक वर्षासाठी ९९२६ कोटी रुपये दिले जातील.