शिंदे, फडणवीसांसोबत पत्रकार परिषदेत बसताच अजितदादा म्हणाले- "मी ग्वाही देतो की.."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 08:18 PM2023-07-16T20:18:57+5:302023-07-16T20:19:48+5:30
अजित पवार यांचे शिंदे-फडणवीसांच्या सत्तेतील पहिलेच अधिवेशन
Ajit Pawar, Maharashtra Monsoon Session: महाराष्ट्रात २ जुलैला मोठा राजकीय भूकंप झाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार असे हे सरकार यंदाच्या पावसाळी अधिवेशनाला विरोधकांना सामील जाणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार टाकला. मात्र, आम्ही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ असे अजित पवार म्हणाले. शिंदे आणि फडणवीस यांच्यासह पहिल्यांदाच अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत बसताच अजित दादांनी एक ग्वाहीदेखील दिली.
"सभागृहात सत्ताधारी पक्षाची उपस्थिती ठेवणे हे आमचे उद्देश्य असेल. जेणेकरून प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सारेच लोक तयार असतील. विरोधकांकडून जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आयुधांचा वापर करुन योग्य पद्धतीने काम केले जाईल याची आम्ही दखल घेऊ. लोकशाही आम्हाला माहिती आहे. आमच्यातील बरेच लोक हे अनुभवी आहेत. त्यामुळे सगळे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यंदाचे पावसाचं प्रमाण म्हणावं तसं दिसत नाही. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाने पाऊस पडला तर बळीराजा नक्कीच समाधानी राहिल. पण एक गोष्ट मात्र नक्की, मी तुम्हाला ग्वाही देतो की, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना थातूरमातूर उत्तर देऊन बोळवण करण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून होणार नाही. आम्ही विरोधकांना व्यवस्थितपणे उत्तर देण्याचं काम करु", असे अजित पवार यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
"उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आम्ही जनतेच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा करु. लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करु. विरोधी पक्ष हा विरोध करण्याच्या मानसिकतेतून अद्याप निघालेला नाही. एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीच्या मंदिराने दिलेल्या निर्णयाला मानायचं नाही हा प्रकार योग्य नाही. हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे त्यामुळे सरकारला बेकायदेशीर म्हणणे चुकीचे आहे. तसेच विरोधकांच्या पत्रात काही मुद्दाच नव्हता त्यामुळे त्यांनी पत्र देण्याऐवजी ग्रंथच लिहीला", असे फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
"राज्यात पाऊस चांगल्या प्रमाणात झाला नाही. पाऊस न आल्याने आम्हाला देखील चिंता आहे. शेवटी निसर्ग आहे लहरीप्रमाणे अतिवृष्ठी गारपीट होत आहे. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधी पक्ष गोंधळलेला असून त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे. तसेच विरोधी पक्ष कुठे आहे हे देखील शोधले पाहिजे. आम्ही तिघांनीही विरोधी पक्षनेते पद सांभाळले आहे. त्यामुळे विरोधकांनी देखील त्यांचं काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. विरोधकांना चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. फडणवीस बॅटिंग, बॉलिंग करतात चौकार आणि षटकार मारतात. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी राज्याबद्दल प्रेम दाखवल्यामुळे राज्याबाहेर गेलेले अनेक प्रकल्प आले", असे शिंदे म्हणाले.