मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेत बसायला मिळेल या आशेने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष पूर्ण रिकामा होतो की, अशी शक्यता निर्माण झाली होती. तर सत्ताधारी भाजपकडूनही राष्ट्रवादीच्या गळतीवर टीका करण्यात येत होती. मात्र शरद पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्या सर्वांना धडा शिकवला. अनेक गयारामांना पवारांनी पराभवाची धूळ चारली. पुतणे अजित पवार यांनी देखील गयारामांच्या पावलावर पाऊल ठेवून बंडखोरी केली आहे. आता शरद पवार पुतणे अजित पवारांना देखील धडा शिकवणार की, राष्ट्रवादीत परतल्याबद्दल मंत्रीपदाचे बक्षीस देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले असताना अजित पवार यांनी सकाळी भाजपशी हात मिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ही शपथ त्यांनी केवळ गटनेता म्हणून असलेल्या आमदारांच्या सह्यांच्या पत्राच्या जोरावर घेतली होती. अर्थात याला भाजपचं पाठबळ होतंच. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्याने सरकार टिकण्याची मदार सर्वस्वी न्यायालयाच्या निर्णयावर होती.
दरम्यान न्यायालयाने संविधान दिनाच्या दिवशी ऐतिहासिक निकाल देत भाजपच्या असंविधानिक कृतीला कचऱ्याची पेटी दाखवत निर्णय दिला. त्यामुळे अजित पवार यांचे भाजपच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान राहण्याचे स्वप्न भंगले. मात्र त्यांच्या या निर्णयाने शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. अजित पवारांनी सत्तेसाठी काकांशी आणि पक्षासोबत बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र काकांनी आपली चाल हाणून पाडल्याचे लक्षात येताच अजित पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीला शरण आले. अजुनही अजित पवारांच्या समर्थकांना भाजपमध्ये जावून परत येण्याची त्यांची मुद्दामहून खेळलेली चाल वाटते. मात्र यात तथ्य दिसून येत नाही.
अपयशी बंडखोरीनंतर आता अजित पवारांच्या भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार यांनी बंडखोरी करणाऱ्या अनेकांचा बंदोबस्त केला आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना पराभूत करून मोठा धक्का दिला. आता तोच न्याय पुतण्यासाठी राहिल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना अजित पवारांना बंडखोरीची शिक्षा मिळेल की मंत्रीपदाचे बक्षीस असा प्रश्न राष्ट्रवादीच्या सुजान कार्यकर्त्यांना पडला आहे.