बारामती : काऱ्हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची ७३ एकर ७ गुंठे शेतजमीन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेला हस्तांतरित करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी सोमवारी रद्द केला आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेने ‘कृषी उद्योग मूल’ शिक्षण संस्थेला तत्काळ जमीन परत करावी, असे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे काऱ्हाटी ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चपराक बसली आहे.‘लोकमत’ने जमीन हस्तांतराचे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ग्रामस्थांनीही ग्रामसभा घेऊन या निर्णयाला विरोध केला. त्यानंतरच्या सर्व आंदोलनाचा पाठपुरावा ‘लोकमत’ने केला. माहिती अधिकार कार्यकर्ते रवी बऱ्हाटे यांनी जानेवारीमध्ये धर्मादाय आयुक्तांकडे जिल्हाधिकाऱ्यांसह एकूण ३२ जणांच्या विरोधात दावा दाखल केला. विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेवर अजित पवार संचालक आहेत, तर जमीन हस्तांतराच्या वेळी कृषी उद्योग मूल संस्थेच्या अध्यक्षपदीही तेच होते.विधानसभा निवडणुकीपूर्वी कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची ७३ एकर ७ गुंठे शेतजमीन विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हस्तांतरित करण्यात आली होती. या निर्णयाला ग्रामस्थ आणि कृषी उद्योग मूल संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हरकत घेतली. याच्या नोंदणीला हरकत घेण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यात आले. त्यावर सुनावणी झाली नसतानाच ही जमीन विद्या प्रतिष्ठानकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन लढा उभारला.नियमानुसार विद्या प्रतिष्ठानने ९६ लाख रुपये शासकीय नजराणा भरला होता. ही रक्कम विद्या प्रतिष्ठानला व्याजासह परत करण्याचे आदेश सहधर्मादाय आयुक्त शिवकुमार ग. दिघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अजित पवार अध्यक्ष झाल्यानंतर या जागेवर सध्या २ मजली शाळा बांधण्यात आली आहे़ )
अजित पवारांना दणका
By admin | Published: August 04, 2015 1:47 AM