आरोपांची राळ उठवणाऱ्या धसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; अजितदादा म्हणाले, "त्यात काय चुकीचं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 20:00 IST2025-02-15T19:55:35+5:302025-02-15T20:00:39+5:30

आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली

Ajit Pawar reacted to the meeting between Suresh Dhas and Dhananjay Munde | आरोपांची राळ उठवणाऱ्या धसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; अजितदादा म्हणाले, "त्यात काय चुकीचं"

आरोपांची राळ उठवणाऱ्या धसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; अजितदादा म्हणाले, "त्यात काय चुकीचं"

Ajit Pawar on Suresh Dhas Dhananjay Munde Meeting: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं आहे. सुरेश धस यांनी या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवास्थानी जाऊन भेटले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. या भेटीवरुन सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. 

एकीकडे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीचे समर्थन केले आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीत गैर काय असा सवाल अजित पवार यांनी केला. माणुसकीच्या नात्याने दोघांची भेट झालेली आहे आणि देशमुख कुटुंबीयांच्या भावना देखील योग्य आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. 

"एक मंत्री आहेत तर दुसरे आमदार आहेत यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे मागे आम्ही सुद्धा एकमेकांच्या विरोधात होतो परंतु आम्ही भेटायचं बोलायचं अशा पद्धतीने ते गेले होते बाकी काही नाही त्याचा वेगळा अर्थ काढू नका. समजा तुम्ही जर आजारी पडलात आणि जर तुमचे एखाद्या व्यक्तीसोबत जमत नसेल, पण तो तुमची विचारपासून करण्यासाठी  आला तर त्याच काही चुकीचं आहे का?," असा सवाल अजित पवार यांनी केला.

देशमुख कुटुंबांच्या मागण्या योग्य

"संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झालेली आहे. कोणालाही त्याचं वाईट वाटणारच. त्यांची पत्नी असेल दोन लहान मुलं असतील, बंधू असतील त्यांचं कुटुंब असेल. त्या सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना येणं साहाजिक आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या योग्यच आहेत," असंही अजित पवार म्हणाले.

आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु

"आमचा प्रयत्न आहे की न्यायालयीन चौकशी, सीआयडी, एसआयटी यांच्याकडून या प्रकरणातील रिपोर्ट लवकरात लवकर यावेत. मुख्यमंत्री सांगतायेत मी पण सांगतोय  या प्रकरणात कोणीही दोषी असेल त्यांची कोणाचीच गय केली जाणार नाही. ज्याच्या पर्यंत धागेदोरे पोहोचतील त्यांना कडक शासन केलं जाईल. तपासाला वेळ लागतो. आज साठ दिवस झाले पण त्यातील एक व्यक्ती अजूनही सापडत नाही. असं होत नाही पण दुर्दैवानं तो सापडत नाहीये. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे," असं अजित पवार म्हणाले.

Web Title: Ajit Pawar reacted to the meeting between Suresh Dhas and Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.