"साहेब म्हणजेच पार्टी, पण त्यांचा निर्णय झालाय... भावनिक होऊ नका"; अजितदादांनी समजावलं-दटावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 03:22 PM2023-05-02T15:22:22+5:302023-05-02T15:23:09+5:30
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांपुढे वेगळी भूमिका मांडली.
मुंबई : मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या "लोक माझे सांगाती" या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. यानंतर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. "साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या", अशी विनंती करत कार्यकर्त्यांनी मोठ्यामोठ्याने घोषणा दिल्या. मात्र, यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांपुढे वेगळी भूमिका मांडली.
अजित पवार म्हणाले, "पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षातच नाही, असा अर्थ होत नाही. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जातेय. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचे काम करेल. शेवटी साहेब म्हणजेच पार्टी हे कुणी सांगायची गरज नाही.आता पवार साहेबांनी तो निर्णय घेतला आहे, ते जनतेचं ऐकत असतात. वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. जो अध्यक्ष होईल तो पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल."
याचबरोबर, "देशभरात मीटिंग करणे, लोकांना भेटणे सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रांताध्यक्ष झालं तरी पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली पार्टी चालणार आहे. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता. काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. कुणीही अध्यक्ष झालं तर साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे... नव्या अध्यक्षाला राजकारणातले बारकावे सांगतील ना...आपण साहेबांनी हाक दिल्यावर येणारच...खासदारकी आमदारकी बाबत सर्व निर्णय तेच घेतील.", अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना समजावले.
सुप्रिया तू बोलू नको, अजित पवारांनी दटावलं
अजित पवारांचं बोलून झाल्यानंतर कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती केली. सुप्रिया सुळेही समोर बसून सर्व पाहात होत्या. मात्र त्याचवेळी अजित पवार यांनी तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून अधिकार वाणीने सांगतोय, असे सुप्रिया सुळेंना सांगितले.