Ajit Pawar's Reaction On Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा: अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, बोभाटा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 06:55 PM2022-04-17T18:55:26+5:302022-04-17T18:56:18+5:30
Ajit Pawar Reaction On Chandrakant Patil's Himalaya statement: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का? या प्रश्नावर देखील त्यांनी भाजपाला उत्तर दिले.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अयोध्या दौऱ्याची तारीख सांगितली. यावरून आता राजकारण रंगू लागले असून युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे त्या आधीच अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी अचानक घेतलेल्या या भूमिकेवर उप मुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे.
गिरगाव चौपाटीबाबत अनेक वर्षे मुंबईतील किंवा राज्यातील लोक येत असतात. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेक लोक या रस्त्यावरून ये-जा करतात. असे असले तरी गिरगाव चौपाटीकडे दुर्लक्ष झाले होते. मी जाता येता काम पाहत होतो. आदित्य ठाकरेंनी चांगले काम केले. चांगल्या कामाला राजकीय भूमिकेतून विरोध करू नये, काहींनी सीआरझेडचे उल्लंघन केले, नियम पाळले नाहीत असे म्हणत विरोध केला, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली.
मी माहिती घेतली असता सर्व नियम पाळले गेलेले आहेत. लोकांना सोयीचा वेळ या गॅलरीसाठी ठेवण्याचा प्रयत्न होईल. मुंबईत आमचा तरुण सहकारी जातीने लक्ष देऊन काम करतोय. फ्लायओव्हरच्या खाली रंगरंगोटी, गार्डन आदी करत आहेत. ज्या शहरांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी ही कामे करावीत, असा सल्लाही पवारांनी दिला.
याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का? या प्रश्नावर देखील त्यांनी भाजपाला उत्तर दिले. निवडणुकीच्या काळात अनेक पक्षांचे नेते वेगवेगळी वक्तव्ये करत असतात. कुणीच सगळे सोडून हिमालयात जाणार नाही, विजय-पराजय होत असतो. यामुळे त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. काहीजण स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा पद्धतीने मते मिळविता येईल का, भावनिक कार्ड खेळता येईल का, काही वेगळा प्रयत्न करता येईल का. असे पाहत आहेत. त्याला काल कोल्हापुरात चपराक बसली आहे, असे अजित पवार म्हणाले.
राज ठाकरेंच्या अयोध्या वारीवर छेडले असता अजित पवार म्हणाले की, कोणी अयोध्या वारी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला जायचेय त्याने एवढा बोभाटा कशाला करायचा. आम्ही काहीतरी वेगळे करून दाखवतो हे प्रयत्न सुरु आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत मराठी माणसांना एकत्र केले. आम्ही तेव्हा विरोधात बसलो होतो. ते मराठी लोक आपल्यासोबत यावेत यासाठी कोणाला उत्साही आरती करावीशी वाटते, काही घोषणा कराव्या लागतात. आम्हीही काल आरती केली, परंतू त्यातून आम्ही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही निवडणुकीत योजना मांडू, विकासकामे केलीय त्यावर मते मागू, असे अजित पवार म्हणाले.