मुंबई - विधान परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी समसमान संख्या आहे. शिवसेनेचे संख्याबळ २ ने जास्त आहे. विधानसभेत आमचं संख्याबळ जास्त आहे. विधान परिषदेत सभापती पद रिक्त आहे. उपसभापतीपद भरलेले आहे. राज्य सरकारचं मत यात महत्त्वाचे आहे. विधान परिषदेच्या कामकाजाबाबत उद्या बैठक आहे. सरकारची भूमिका काय आहे हे विचारल्यावर पुढील निर्णय होईल असं विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमात सुरू आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तार असेल तर मुख्य सचिवांकडून विरोधकांना निमंत्रण दिले जाते. अद्याप असे पत्र आले नाही. कदाचित रात्री उशिरा येऊ शकते. दिल्लीवारीनंतर नंदनवनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी दाट शक्यता वाटते. परंतु अधिकृत निमंत्रण नाही अशी माहिती त्यांनी दिली.
त्याचसोबत उद्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. त्याबाबत आम्हाला कळवण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून कळवले नाही. मंत्रिमंडळ कधी करायचा हे अनेक दिवस रखडले होते. मात्र लवकरात लवकर करू असेच आश्वासन दिले जात होते. सरकारमधील वेगवेगळ्या सहकाऱ्यांना मुंबईला बोलावलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं.
शिवसेनेला हवंय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदराज्यात सत्तांतर घडल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. विधानसभेत संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. परंतु विधान परिषदेत सभापती, विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. याठिकाणी विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला आहे. शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चा आहे. विधान परिषदेत सध्या घडीला काँग्रेस-राष्ट्रवादीचे १० सदस्य आहेत. तर शिवसेनेचे १२ सदस्य आहेत. त्यात उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे विराजमान आहेत. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.