"मला रंग आवडला म्हणून तो निवडला"; गुलाबी राजकारणावरुन अजित पवारांचे रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 09:16 PM2024-08-15T21:16:46+5:302024-08-15T21:20:07+5:30
जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाचा प्रभाव दिसून येत असल्यावरुन अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
Ajit Pawar Pink Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाने प्रचाराला सुरुवात केली आहे. जनसन्मान यात्रेतून अजित पवार यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मात्र या यात्रेच्या आधीपासूनच अजित पवार यांचा वेगळाच लुक समोर आलाय. अजित पवार हे सध्या गुलाबी जॅकेट घालून वावरताना दिसत आहे. जनसन्मान यात्रेवरही गुलाबी रंगाचा प्रभाव दिसून येत आहे. या रंगावरुन आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये गुलाबी जॅकेट घालून उपस्थित राहत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेपेक्षा अजित पवारांच्या गुलाबी राजकारणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी गुलाबी रंग का निवडला याबाबत भाष्य केलं आहे. मला गुलाबी रंग आवडला म्हणून आम्ही तो निवडला, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगच का? असा सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला होता. “मला गुलाबी रंग आवडला म्हणून आम्ही तो निवडला. अमुक एक रंग निवडला म्हणून जर मतं मिळाली असती तर रोज वेगवेगळे रंग निवडले असते. पुरुषांना काय आवडतं? तो रंग वापरु वगैरे असं निवडलं असतं. आम्ही एक थीम निवडली आहे त्या अंतर्गत गुलाबी रंग निवडलाय इतकंच यामागचं कारण आहे. आमच्या मनात रंग आला त्यामुळे नाही. आता या रंगाची चर्चा होते. अजित पवारांकडे या कलरचं जॅकेट का होतं याचीही चर्चा होते. जांभळ्याच्या आतला जो रंग असतो तो रंग आम्ही घेतला आहे,” असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.
"गुलाबी रंग निवडून आम्ही काही स्ट्रॅटेजी वगैरे आखलेली नाही. चंद्राबाबू नायडूंना पिवळा रंग आवडतो त्यांनी तो घेतला आहे. मला हा आवडला मी हा निवडला आहे. हा रंग महिला मतदारांना आकर्षित वगैरे करण्यासाठी वगैरे मुळीच नाही. अजित पवारच्या मनात जे येतं तेच मी करतो. मी त्यानंतर विचार करत नाही. एखादं वक्तव्य केलं तरीही मी मागे हटत नाही. मी त्यावर ठाम राहतो त्यावरुन वाद झाला तरीही मी पर्वा करत नाही," असंही अजित पवार म्हणाले.
शरद पवारांची प्रतिक्रिया
गुलाबी रंगामुळे विधानसभेला महिला वर्ग अजित पवारांकडे आकर्षित होईल का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना शरद पवार यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच प्रतिप्रश्न केला. तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घातल्याने तुमच्याकडे महिला आकर्षित होती का? असा सवाल पवारांनी केला. शरद पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे एकच हशा पिकला होता.