अजित पवारांना पश्चाताप, शिंदे यांच्या विसर्जनानंतर...; विनायक राऊतांचे धक्कादायक दावे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 07:55 PM2023-11-15T19:55:37+5:302023-11-15T19:56:12+5:30
अजित पवार कौटुंबीक कार्यक्रमांना जात आहेत, परंतू सरकारच्या कोणत्याही बैठकीला किंवा दौऱ्याला जात नाहीएत.
अजित पवार गेल्या महिन्यापासून सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. परंतू, त्यांनी दिवाळीत दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शाहा यांनी भेट घेतली होती. तरी देखील अजित पवार कौटुंबीक कार्यक्रमांना जात आहेत, परंतू सरकारच्या कोणत्याही बैठकीला किंवा दौऱ्याला जात नाहीएत. यावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी महायुतीतील वादावर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर मोठे दावे केले आहेत.
अजित पवार यांना आता पश्चाताप झाला आहे. यातून मुक्त कसे व्हावे याचा ते विचार करत असल्याचे विनायक राऊत म्हणाले. याचबरोबर अजित पवार हे स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेला खरा वाव देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले होते. परंतू, आता तशी परिस्थिती राहिलेी नाही. प्रत्येक गोष्टीत अजित पवारांची गळचेपी केली जात आहे. गेल्या आठवड्यातील अमित शहांच्या भेटीत शिंदे यांच्या विसर्जनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावे, अशी मागणी अजितदादांनी केली असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
डिसेंबर महिन्यात महायुतीमध्ये मोठा स्फोट होणार असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. तीन तिघाडा काम बिघाडा अशी आपल्याकडे म्हण आहे. फक्त ईडीच्या कारवाईच्या दबावामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी झाले आहेत. ते त्यांच्यात मिसळलेले नाहीएत. भाजपाची हाव खूप मोठी असल्याने आपलंच घोडे रेटण्याचे काम होणार आहे. यामुळे ३१ डिसेंबरपूर्वीच महायुतीत मोठा स्फोट होणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
अकोला प्रकाश आंबेडकरांसाठी राखीव...
अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर निवडून येतील अशी शंभर टक्के खात्री आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ती जागा राखीव ठेवण्यास हरकत नाही, असा विचार महाविकास आघाडीत सुरु आहे. जिंकलेल्या जागांपेक्षा एखाद्या जागी मेरिटवर चांगला उमेदवार असेल तर ती जागा मित्रपक्षांना सोडण्यास हरकत नसावी, हा विचार तिन्ही पक्षांना पटल्याचे राऊत म्हणाले.