औरंगाबाद: राज्यातील अनेक ठिकाणी महानगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यासह पक्षांतरही वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. यातच येथील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, महत्त्वाच्या सूचना देताना अजित पवार यांनी दिवंगत आरआर आबा म्हणजेच आर. आर. पाटील यांची आठवण काढली.
आरआर आबा यांच्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही या पक्षातम काल आलेला आणि जुना असा भेदभाव करत नसतो. कोणती राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांना पदे मिळाली. आर. आर. पाटील असेच एक नाव आहे त्यांनी अनेक पद भूषवली, असे सांगत आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे. पक्षपात करू नका, कुणाबद्दलही आकस बाळगू नका, सर्वांची कामे समतोलने करा. हलक्या कानाचे अजिबात होऊ नका, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
संघटन मजबूत करण्यावर राष्ट्रवादीचा नेहमीच भर
राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा चांगलाच बोलबाला पहायला मिळाला. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर राष्ट्रवादीचा नेहमीच भर राहिला आहे. नगसेवकांच्या प्रवेशाने पुन्हा ते दिसून आले आहे. या नगरसेवकांच्या प्रवेशाने या भागात राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे, एवढे मात्र नक्की, असे अजित पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, मविआ सरकार चांगले काम करत आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे अर्थकरणावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.