Ajit Pawar on Tanaji Sawant Statement : "राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपले कधीच पटले नाही. मंत्रिमंडळ बैठकीत मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात", असे विधान शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी केले. यामुळे महायुतीत एकत्र असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुरावा कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. पण, अजित पवारांनी वेगळी भूमिका मांडली आहे.
नागपूर येथ अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. तानाजी सावंताच्या विधानाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "मला बाकीचे काही बोलायचे नाही. मला माझ्या पुरते बोला. याने असे केले. त्याने तसे केले. मला काही कुणाशी देणे घेणे नाही."
"माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत"
"मी जनसन्मान यात्रेच्या सुरूवातीलाच ठरवले आहे की, मला कोणावर टीका करायची नाही. मला कोणी काही बोलले तर माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. मी काम करतो. मी कामाचा माणूस आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चांगल्या योजना महाराष्ट्रातील जनतेला देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ते सांगण्याचे काम आमचे चालू आहे."
"मोदी-शाहांसोबत चर्चा झालेली आहे"
भाजपचे प्रवक्त गणेश हाके यांनीही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती दुर्दैवी आहे, असे बोलले. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "ठीक आहे. आम्ही चर्चा केलेली आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांशी आम्ही चर्चा केली आहे. तुम्ही जर असे बोलत बसलात, तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात. या बोलण्याला मी फार महत्त्व देत नाही. माझे काम चालू आहे.