मुंबई : रत्नागिरीमधील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी येथील जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, त्याविरोधात हजारो ग्रामस्थ बारसूमधील सड्यावर जमले आणि त्यांच्याकडून पोलीस व अधिकाऱ्यांची वाट अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व आंदोलक ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना तेथून रत्नागिरीमध्ये आणण्यात आले असून, पोलिस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला एक विनंती केली आहे.
"बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका", अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत सरकारला केली आहे. तसेच, रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या आंदोलनावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, बारसूमधील रहिवाशांना धमक्या दिल्या जात आहेत. हे अत्यंत विकृत मनोवृत्तीचे सरकार आहे. हे दहशतवादी मनोवृत्तीचे सरकार आहे. मला असे वाटते की, बारसूमधील हे लोक तिथून हटले नाही, तर त्यांच्यावर गोळ्यासुद्धा झाडल्या जातील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवले जाईल, अशी मला भीती वाटतेय. उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. कदाचित मुंबईला तिथे लक्ष घालावे लागेल आणि आम्हाला तिथे जावे लागेल. आम्ही जनतेसोबत आहोत. जनतेने विरोध केलेला आहे. जनता छातीवर गोळ्या झेलण्यास तयार आहे. जनता तुरुंगात जायला तयार आहे, अशावेळी शिवसेना ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळपासूनच बारसू परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. मातीचे सर्वेक्षण करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचा कंटेनर सर्वेक्षणस्थळी दाखल झाला आहे. कामात कोणतीही अडचण येऊ नये, ग्रामस्थांनी काम अडवू नये, यासाठी तेथे प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र मंगळवारी सकाळी नियोजित सर्वेक्षणस्थळाकडे जाणाऱ्या पोलिसांच्या अनेक गाड्या ग्रामस्थांनी वाटेतच अडवल्या. त्यात अनेक महिला ग्रामस्थ रस्त्यावर झोपल्या होत्या, या सर्व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.