मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा का दिला, ते पुढे काय करणार, राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का, या बाबत आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. काका शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्याने की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दिले जात असलेले महत्त्व त्यासाठी कारणीभूत ठरले की लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थच्या पराभवाची किनार या राजीनाम्याला आहे या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
राजीनाम्याची संभाव्य कारणे काय...?1. ‘‘राज्य सहकारी बँकेची सूत्रे तुमच्या हाती होती. तुमच्यामुळे आज ईडीच्या कारवाईची पाळी आली आहे’’, असे बोल कुटुंबातीलच एका जबाबदार व्यक्तीने सुनावल्याने अजित पवार अस्वस्थ झाले आणि त्याच क्षणी त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मिळते.2. अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते, विशेषत: पुत्र पार्थ पवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तेव्हापासून.3. राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यामुळेच पक्ष सोडला. विशेषत: विजयसिंह मोहिते, उदयनराजे यांनी त्यांच्यामुळेच पक्ष सोडल्याची चर्चा पक्षात सुरू होती.
4. जवळचे नातेवाईक पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी.5. विधानसभेला आपल्या समर्थकांना उमेदवारीबाबत डावलले जाण्याची दाट शंका6. पुतण्या रोहित पवार यांचे पक्षात वाढत असलेले वजन.7. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी फक्त स्वत:चा बचाव केला. अजित पवारांसह इतरांबद्दल ते काहीच बोलले नाहीत.8. शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीच्या ध्वजासोबत भगवा ध्वज वापरून ‘सॉफ्ट हिंदुत्वाची’ लाईन घेतल्यामुळे शरद पवारांची नाराजी.