सकाळी ८ वाजता शपथविधी झाला, त्याला पहाट म्हणतात का? अजित पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 12:11 PM2022-05-15T12:11:03+5:302022-05-15T12:11:36+5:30
सरकार येऊन अडीच वर्ष झाली, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे असं अजित पवारांनी सांगितले.
सांगली – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी बीकेसीतील सभेत भारतीय जनता पार्टीवर हल्लोबल केला. पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसला असता असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला. मात्र आता यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. त्यावर काही बोलायचं नाही असं विधान केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, सरकार येऊन अडीच वर्ष झाली, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मी मागेही सांगितले मला ज्यावेळी योग्य वाटेल तेव्हा मी बोलेन. मला आता सांगावं वाटत नाही. अजित पवार तोपर्यंत कधी बोलणार नाही. सरकार आले काम करतंय. सकाळी ८ वाजता शपथविधी झाला. त्याला पहाटे कसं म्हणता येईल. सरकार होऊन अडीच वर्ष झाले. आता काही बोलायचं नाही. योग्य वेळी बोलेन असं त्यांनी म्हटलं.
तसेच मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी मी बोलणार असं सांगितले होते. ते बोलले नसते तर मुख्यमंत्री का बोलत नाही असा अर्थ काढला असता. ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी काय भूमिका मांडायची त्यांचे मत आहे. मला ते काही बोलले त्यावर प्रतिक्रिया देण्यात रस नाही. दुर्दैवाने विकासाच्या कामाबद्दल बोलण्याऐवजी हेडिंगसाठी बातम्या दिल्या जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही अजित पवार म्हणाले.
शरद पवारांवरील विधान योग्य नाही – अजित पवार
प्रत्येक व्यक्ती कुणाला आदर्श ठेवून काम करते. शरद पवारांची ६० वर्षाच्या कारकिर्दीत सातत्याने महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगला विचार पुढे घेऊन आले आहेत. कमरेखालचे वार ते कधीच करत नाही. यशवंतराव चव्हाणांच्या पथडीत ते तयार झाल्याने कधी त्यांचा तोल ढासळला नाही. अशा व्यक्तीविरोधात कुणी घाणेरडे वक्तव्य करते हे योग्य नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की...
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानं त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. यावर देखील उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. हो, आम्ही काँग्रेससोबत गेलो, मात्र ते उघड गेलो. आम्ही केलं ते उघड केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर पाप आणि तुमची पहाटेची शपथ काय होती? जर ती यशस्वी झाली असती तर आज नवाब मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.