भाजपात गेलेले कंटाळून परतले : अजित पवार
By admin | Published: January 25, 2017 10:30 PM
आमच्यातून जे गेले ते गेले, त्यांचा विचार करीत नाही; मात्र जे गेले त्यांच्यातील अनेकांचा तिथला अनुभव चांगला नाही. त्यातील काही परतही येऊ लागले आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी टीका केली.
पुणे : आमच्यातून जे गेले ते गेले, त्यांचा विचार करीत नाही; मात्र जे गेले त्यांच्यातील अनेकांचा तिथला अनुभव चांगला नाही. त्यातील काही परतही येऊ लागले आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीवर थेट नाव न घेता टीका केली. समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सूचना आहे, त्याप्रमाणे काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची बोलणी सुरू आहेत, असे ते म्हणाले.
जंगली महाराज रस्त्यावर पक्षाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद््घाटन पवार यांच्या हस्ते झाले. काँग्रेसचे नगरसेवक, माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना काकडे, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, पक्षप्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, तसेच अन्य पदाधिकारी, नगरसेवक, इच्छुक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
भाजपात गेलेल्या विनायक तांबे यांना या वेळी पक्षात प्रवेश देण्यात आला. त्याचा उल्लेख करून पवार म्हणाले, ‘‘तिथे गेलेले आता भेटून सांगतात की राष्ट्रवादीमध्ये एका कुटुंबासारखे वाटत होते. तिथे आम्हाला वेगळे वागवतात. परत पक्षात यायचे आहे. जाणारे आमच्याकडे आले तेव्हा कोणीही नव्हते. पक्षाने त्यांना पद दिले, प्रतिष्ठा दिली. आता त्यांना नको वाटत असेल तर आग्रह नाही.’’
पवार म्हणाले, ‘‘आघाडीसाठी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू आहेत. जागा निश्चित होत आहेत. आता बुधवारी दोन्ही शहराध्यक्षांमध्ये चर्चा होईल व अंतिम निर्र्णय घेतला जाईल. समविचारी पक्ष बरोबर असावेत असा आमचा प्रयत्न आहे. याचा अर्थ भाजपाला घाबरून आघाडी करीत आहोत असा नाही. यापूर्वी काँग्रेसशी आघाडी केली नाही याचे कारण आम्ही पुण्यातील तत्कालीन काँग्रेस नेत्यांच्या विरोधातच होतो. आता तसे नाही. सध्याच्या त्यांच्या नेतृत्वाशी मतभेद नाहीत. त्यामुळेच चर्चेत आमची भूमिका सकारात्मक आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यातही आघाडीसंदर्भात चर्चा झाली आहे. स्थानिक नेत्यांचे म्हणणे लक्षात घेऊन यासंबंधीचे निर्णय घेण्यास दोघांचाही संमती आहे.’’
मोहिनी देवकर यांना उमेदवारी देणार याची खात्री हवी होती, ती देता येत नव्हती, त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले, असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)