राज्यपालांची भेट घेणाऱ्या विनोद तावडेंची अजित पवारांनी उडवली खिल्ली, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 08:01 PM2019-11-05T20:01:55+5:302019-11-05T20:06:12+5:30
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारलेल्या विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या भेटीवरून खिल्ली उडवली आहे.
मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारलेल्या विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या भेटीवरून खिल्ली उडवली आहे. सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी नव्हे तर, आपलं तिकीट का कापलं असावं, याची विचारणा तावडेंनी राज्यपालांकडे केली असावी, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
एकीकडे महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि वादळ या अस्मानी संकटांमुळे राज्यातील शेतीचे झालेले मोठे नुकसान या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र आघाडीचे नेते राज्यपालांना भेटण्यापूर्वी विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.
राज्यात सत्तास्थापनेबाबत तावडेंनी राज्यपालांची भेट घेतली असावी, अशी चर्चा सुरू होती. त्यावरून विचारणा केली असता अजित पवार यांनी विनोद तावडे यांना टोला लगावला. ''माझ्या माहितीप्रमाणे विनोद तावडे हे सध्याच्या विधानसभेचे सदस्यसुद्धा नाहीत. ते आपल्या नेत्याला मतसुद्धा देऊ शकत नाही. ते इथे येऊन काय चर्चा करणार आहेत. नेते म्हणून चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे आले असते, त्यांनी चर्चा केली असती तर मी समजू शकलो असतो. राज्यपाल महोदय तुम्ही आधी भाजपामध्ये होता. माझं तिकीट काहो कापलं असेल हे विचारायला कदाचित तावडे आले असतील,''असा चिमटा अजित पवार यांनी काढला.
दरम्यान, राज्यापालांना भेटल्यानंतर अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका केली. तसेच सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणंघेणं नाही, मुख्यमंत्री कोणाचा होणार याचीच काळजी असल्याचं म्हणत त्यांनी सेना-भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला.
पुढे ते म्हणाले, शेतीच्या प्रश्नाबाबत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. सांगली, कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहोचलेली नाही. ओल्या दुष्काळाची माहिती राज्यपालांना दिली असून, वीजबिल आणि कर्जमाफीची राज्यपालांकडे मागणी केल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे. खरिपाचं पिकंही वाया गेलं आहे. तातडीनं हेक्टरी 1 लाखांची मदत द्या. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सरकारचं अपयश असून, आम्हाला राजकारण करायचं नाही. क्यार आणि महा चक्रीवादळामुळे मच्छीमारांचं अतोनात नुकसान झालेलं आहे.