साईबाबा जन्मस्थळ वादावर चर्चेतून मार्ग काढू : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 02:31 PM2020-01-19T14:31:15+5:302020-01-19T14:31:24+5:30
शिर्डीकरांनी आपला बंद मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई : साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर उघडे असून, दुकाने, बाजार मात्र बंद असल्याचे पाहायला मिळत. तर या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी झाले आहेत. तर साईभक्तांना शांत राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
साईबाबा जन्मस्थळाचे पाथरीसह आठही दावे तथ्यहीन व दिशाभूल करणारे आहेत़. पाथरीला निधी देण्यास विरोध नाही, मात्र जन्मस्थळाच्या उल्लेखाला तीव्र आक्षेप आहे़. मुख्यमंत्री आपले विधान मागे घेत नाहीत, तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंद राहील, असा निर्णय ग्रामसभेत झाला़ आहे.
दरम्यान, शिर्डीकरांनी आपला बंद मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शिर्डीकरांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. साईबाबांच्या जन्मस्थान वादावर मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी पाथरी आणि शिर्डीच्या नागरिकांना कोणाच्याही भावना न दुखवता चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. मुख्यंत्र्यांप्रमाणे मी देखील सर्वांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन करतोय, असे अजित पवार म्हणाले.