अजित पवार म्हणाले, 'बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही चूक'; सुप्रिया म्हणाल्या ‘रामकृष्ण हरी’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 12:22 PM2024-08-14T12:22:54+5:302024-08-14T12:23:52+5:30
राजकारण फार घरात शिरू द्यायचे नसते, मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली, असेही अजित पवार म्हणाले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करणे, ही चूकच झाली अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी ‘रामकृष्ण हरी’ अशी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा अजित पवार जोरदार प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनेने घरातील लाडक्या बहिणींबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी चूक झाल्याची कबुली दिली.
राजकारण घरात नको
सगळ्या बहिणी माझ्या लाडक्या आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, अनेक घरांत राजकराण चालते; पण राजकारण फार घरात शिरू द्यायचे नसते, असे सांगत मागे मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते; पण त्यावेळेस ते झाले. पक्षाच्या पार्लमेंट बोर्डाने निर्णय घेतला. एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही; पण माझे मन आज सांगते आहे हे व्हायला नको होते, असे अजित पवार म्हणाले.
तर रक्षाबंधनाला जाणार!
अजित पवार दरवर्षी सुप्रिया सुळेंसह आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेतात. यावेळी बहिणींकडे रक्षाबंधनाला जाणार का, यावर अजित पवार म्हणाले की, माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. जर त्याच काळात मी इथेच असेन आणि माझ्या बहिणीही इथे असतील तर मी रक्षाबंधनाला जरूर जाणार.
हात जोडत म्हणाल्या....
‘एकतर मी हे विधान ऐकलेले किवा वाचलेले नाही. तुमच्याकडूनच मी हे ऐकत आहे. त्यामुळे ‘रामकृष्ण हरी’, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. यावेळी त्यांनी हात देखील जोडले.