ईडी चौकशीनंतर राज ठाकरेंच्या 'अळीमिळी गुपचिळी'वरून अजित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:39 PM2019-09-11T15:39:16+5:302019-09-11T15:41:23+5:30
ईडीने साडेआठ तास चौकशी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे.
बारामती: ईडीने साडेआठ तास चौकशी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे. अशा कितीही चौकशी लावल्या तरीही माझं तोंड बंद ठेवणार नाही अशी पहिली प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली होती. मात्र या प्रतिक्रियेवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि आमदार एकापाठोपाठ शिवसेना किंवा भाजपामध्ये प्रवेश करत आहे. तसेच सत्ताधारी पक्षांनी सीबीआय आणि ईडीची भीती दाखवल्याने अनेक आमदार व नेत्यांनी पक्ष सोडला असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला होता. त्यातच राज ठाकरे यांची देखील कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने चौकशी केली होती. चौकशी झाल्यानंतर अशा कितीही चौकशी लावल्या तरीही माझं तोंड बंद ठेवणार नाही असे राज ठाकरेंनी म्हणटले होते, मात्र राज ठाकरे देखील ईडी चौकशी झाल्यापासून कमी बोलायला लागले आहेत, असा टोला लगावल्याने माध्यमात मात्र चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवस शिल्लक असताना मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही हे अजूनही अस्पष्ट असून येत्या काही दिवसात मनसेची भूमिकी स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी नुकताच डोंबिवली दौरा केला असून या दौऱ्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतल्याचे देखील बोलले जात आहे.